Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Solapur › पानगावातील अकराजणांचा श्रमदानाचा आदर्श

पानगावातील अकराजणांचा श्रमदानाचा आदर्श

Published On: May 16 2018 10:15PM | Last Updated: May 16 2018 9:46PMवैराग : आनंदकुमार डुरे

पाण्याचे महत्त्व काय असते हे भर उन्हात तहान लागलेल्या माणसालाच  कळते. याची जाणीव असलेल्या पानगावातील अकरा ग्रामस्थांनी श्रमदानाद्वारे वेगळाच आदर्श घालून दिला आहे. चंदू काळे, बापू गाडे, दयानंद पाटील, दामोदर पवार, शहाजी गुजले, उदय मोरे, दत्ता घोडे, मनिषा काळे, विद्या पवार, बालाजी काळे, बाळासाहेब लोहार अशी त्या अकरा श्रमदात्यांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील पानगावमधील एक नव्हे दोन नव्हे तर चक्क अकराजण कोट्यवधी लिटर पाण्याचे शिल्पकार बनले आहेत. 

कडाक्याच्या उन्ह्यात रक्‍ताचे पाणी करून अवघ्या छत्तीस दिवसांत यांनी सहकार्‍यांच्या मदतीने  कोट्यवधी लिटर पाणी अडवण्यासाठी श्रमदान केले आहे. पानगावने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्श निर्माण केला आहे. पाणी फाऊंडेेशनमध्ये सहभाग घेतल्यानंतर सुरुवातीला तुरळक उपस्थिती जाणवली. मात्र काहीजणांच्या   जिद्द आणि चिकाटीने पुन्हा सहभाग वाढू लागला. यामध्ये तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गावाच्या चारही बाजूने माळरान असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी अडविण्याचे काम चालू झाले. 

दिव्यांगाचाही सहभाग

उच्चशिक्षित पण दिव्यांग असलेल्या  विजयकुमार काळे यांनी कुबड्यांचा  आधार   घेत   घेत     श्रमदानाला सुरुवात केली आहे. विजयकुमारच्या खारीच्या वाट्याने श्रमदानात फार मोठा फरक निश्‍चित पडणार नाही. पण गावाची प्रतिष्ठा राखण्यासाठीची त्याची धडपड मात्र कौतुकास्पद आहे. त्याची  ही इच्छाशक्ती मात्र श्रमदानाला टाळाटाळ करणार्‍या आळशी व संवेदनाहिन ग्रामस्थांना आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. शरीराने दिव्यांग असला तरी विजयकुमारचे कष्ट  इतरांना लाजवणारे आहे. प्रत्येकाने गावासाठी काही करण्याची हीच वेळ आहे.