Mon, Sep 24, 2018 09:05



होमपेज › Solapur › तीस मोरांचा मृत्‍यू, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल 

तीस मोरांचा मृत्‍यू, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल 

Published On: Aug 05 2018 6:00PM | Last Updated: Aug 05 2018 6:00PM



वैराग : प्रतिनिधी 

मालेगांव ता बार्शी येथे शिकारीच्या उद्देशाने राष्ट्रीय पक्षी मोरांसह तब्बल तीस पक्षांचा मुत्यू झाला असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि.४ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. राष्ट्रीय पक्षी मोरांसह अनेक पक्षांचे नुसते सांगाडेच सापडले असले तरी मोरांची बहुंताश पिसे गायब झाली आहेत. त्यामुळे नेमकी शिकारीसाठी विषबाधा झाली आहे की अन्य कारणांसाठी हे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे.

वैराग उस्मानाबाद मार्गावरील मालेगांव येथील घोडके वस्तीवर शनिवारी अनेक पक्षांचा विष बाधेने मुत्यू झाल्याची घटना समोर आल्यावर वन विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन  पाहणी केली. राष्ट्रीय पक्षी मोर ,लांडोर, तितर, भारतद्वाज , व्हाला,लवऱ्या यांचाही मृत पक्षांमध्ये समावेश असल्याचे निदर्शनास आले. यातील काही पक्षांचे कुजलेल्या अवस्थेतील सांगाडे याठिकाणी दिसून आले सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीय पक्षी मोराचे सांगाडे सापडले असले तरी त्यांची पिसे मात्र मिळून आलेले नाहीत मग ही पिसे नेमकी गेली कुठे? 

याबाबत खाजगी मध्ये अधिक चौकशी केली असता असे समजले की मोरांची शिकार ही मोरांच्या मासा साठी करण्यात येते मोराच्या मांसाला जास्त किंमत मिळते तर मोरांचे पंख सुद्धा शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याने त्यांनाही चांगला भाव मिळतो . याठिकाणी शिकारीच्या उद्देशाने मोर व इतर पक्षांची शिकार करण्यासाठी धान्यातून विष प्रयोग केला असावा अशी शक्यता व्यक्त होते पण धान्यामध्ये विषाचे प्रमाण जास्त झाल्याने पक्षांचा मृत्यू झाला असावा . दरम्यान मृत तितर पक्षाचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याच्या फॉरेन्सीक लॅबला पाठवण्यात आले आहेत. या ठिकाणचा अहवाल आल्यावरच पक्षांचा मृत्यू कशाने झाला असावा हे उघड होणार आहे . याप्रकरणी  वन विभागाच्यावतीने अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

[फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण कळणार आहे, सध्या मोरांसह इतर पक्षांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.