Sat, Jul 20, 2019 09:05होमपेज › Solapur › रेल्वेस्थानकावर प्लास्टिक, थर्माकोलबंदी कागदावरच!

रेल्वेस्थानकावर प्लास्टिक, थर्माकोलबंदी कागदावरच!

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 8:46PMसोलापूर : प्रतिनिधी

रेल्वेस्थानकांवरिल प्लास्टिकबंदी फक्त आदेशपुरतीच राहिली आहे. राज्य शासनाने 23 जूनपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लास्टिक पिशव्या व वस्तूंवर बंदीची सक्ती केली आहे.त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनानेदेखील महाराष्ट्रात असलेल्या रेल्वेस्थानकांवर प्लास्टिक व थर्माकोलबंदीचा  आदेश  दिला  होता.

महाराष्ट्रात लागू झालेल्या प्लास्टिकबंदीला पाठिंबा देत मध्य रेल्वेतील जनसंपर्क विभागाकडून रेल्वेस्थानकांवरिल स्टॉल, अधिकृत विके्रते आदींनी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर बंद करावा, असे आदेश  देण्यात  आले होते. परंतु हे आदेश फक्त नावापुरतेच आहे. कारण  रेल्वेस्थानकांवर प्लास्टिकबंदीची  तीव्रता  तेवढ्या  प्रमाणात  दिसून येत नाही. मुंबई डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, पुणे डिव्हिजन, नागपूर डिव्हिजन  व  भुसावळ   डिव्हिजनमधील सर्व स्थानकांवरील स्टॉल, अधिकृत फेरीवाले, आयआरसाटीसी  आदींना  प्लास्टिक  आवरण असलेल्या वस्तूंची विक्री करता येणार नाही, असे आदेश दिले होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी शहरातील  दुकानदारांवर  व   प्लास्टिकच्या    व्यापार्‍यांवर 23 जूनपासून आजतागायत भरारी पथक व तपासणी मोहिमेतून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील दुकानदारांनी कारवाईचा धसका घेत प्लास्टिक पिशव्या पूर्णता बंद केल्या आहेत. बाजारात अनेक वस्तू आता कापडी व कागदी पिशव्यांमधून मिळू लागल्या आहेत. काही ठराविक वस्तूंना मात्र प्लास्टिकमधून  विकण्याची  मुभा  देण्यात  आली आहे. राज्यभरात  भरारी पथके तयार करुन प्लास्टिकचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलला  जात  आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्लास्टिकबंदीच्या कायद्याची अमंलबजावणी करण्याच्या उद्देशाने रेल्वेस्थानकांवर प्लास्टिक व थर्माकोलबंदी आणली आहे. 

रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान किंवा स्थानकांवर थर्माकोलनिर्मित ग्लास, डिस्पोजेबल ग्लास व प्लेट, थर्माकोलच्या व  प्लास्टिकच्या  वाट्या,  ग्लास, भोजनासाठी  वापरण्यात येणार्‍या ताटांवर प्लास्टिकचे पॉलीप्रोपाईलीन  आवरण, बॅग आदींवर ही बंदी लावण्यात  आली आहे. राज्यात  प्लास्टिक व थर्माकोल  अविघटनशील  वस्तूंचे  उत्पादन, वापर, विक्री वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक  करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.महानरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,  नगरपंचायत क्षेत्रात प्राधिकृत व अंमलबजावणी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.परंतु सोलापूर मध्य रेल्वे डिव्हिजनमधील रेल्वेस्थानकांवर कोणतीही प्रभावी अंमलबजावणी व तपासणी मोहीम नसल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर डिव्हिजनमध्ये भरारी पथकच नाही

सोलापूर डिव्हिजनमध्ये 10 जिल्हे असून 96 स्थानके आहेत. प्लास्टिकबंदीचा आदेश पारित झाला असला तरी मध्य रेल्वे प्रशासनाने प्लास्टिकबंदीसाठी एकही भरारी पथक किंवा तपासणी मोहीम हाती घेतली नाही. थर्माकोलनिर्मित ग्लास, डिस्पोजेबल ग्लास व प्लेट, थर्माकोलच्या व प्लास्टिकच्या वाट्या, ग्लास, भोजनासाठी वापरण्यात येणार्‍या ताटांवर प्लास्टिकचे पॉलीप्रोपाईलीन आवरण, कॅरीबॅग आदींवर ही बंदी आणण्यात आली आहे. पण ही बंदी फक्त नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.