Tue, Jul 16, 2019 00:01होमपेज › Solapur › उजनीतून 40 दिवसांत 49 टक्के पाणी वापर

उजनीतून 40 दिवसांत 49 टक्के पाणी वापर

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 9:40PMभोसे : वार्ताहर

15 मार्च पासून उजनी धरणातून कालव्यात सुरू असलेला विसर्ग अद्यापही सुरूच असून आज (दि.24 एप्रिल) पाणी सोडल्याच्या 40 व्या दिवशी धरणात फक्‍त 21 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. एकूणच मागील 40 दिवसांत धरणातील तब्बल 49 टक्के पाणी वापर झाला आहे. उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर 15 मार्च पासून उजनीतून कालव्यासह भीमा सीना जोड कालव्यालाही पाणी सोडण्यात आले. त्यावेळी (दि. 15) धरणात एकूण पाणी साठा 70.52 टक्के होता. 

आज रोजी (दि. 24) दुपारी 12 वाजता धरणात जेमतेम 21.53 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच या 40 दिवसाते 49 टक्के पाणी कमी झाले आहे.   15 मार्च पासून सुरू असलेले आवर्तन अजूनही सुरूच आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामातील दुसरे पाण्याचे आवर्तन 15 मे रोजी सुटणे अपेक्षित आहे. तोपर्यंत धरणातील पाणी आणखी कमी होणार आहे, अशा परिस्थिती पुढील पाण्याचे नियोजन कसे होणार याबाबत शेतकर्‍यांमधून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांनी, धरण प्रशासनाने निकषाप्रमाणे कालव्याला टेल टू हेड पाणी सोडून मागणी नुसार रोटेशन पूर्ण करीत आणले आहे. भोसे परिसरातील फाट्यांना पाणी सुटल्यानंतर दोन तीन दिवसात मुख्य कालव्याचे आवर्तन बंद केले जाते. मात्र यंदा तसे न करता सर्व फाट्यांचे पाणी बंद करून पुन्हा एकदा टेलला पाणी नेले आहे. धरणातील पाण्याचा हा उघड उघड अपव्यय केला जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. सध्या धरणातील पाणी पातळी कमी असली तरी गेल्यावर्षीपेक्षा समाधानकारक आहे, नियोजनानुसार कालव्यातून पुढील महिन्यात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.

Tags :  Ujani Dam, Solapur, Water