होमपेज › Solapur › शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : देशमुख

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : देशमुख

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:27PMसोलापूर : प्रतिनिधी

 शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत माळकवठे येथील सोलापूर ग्रो-प्रोड्यूसर कंपनीच्यावतीने शेती अवजारे वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. माळकवठे येथे झालेल्या या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प  संचालक विजयकुमार बरबडे, तालुका कृषी अधिकारी श्रीधर गावंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीच जयंतीनिमित्त श्री छपत्रती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख पुढे म्हणाले, शेतीचे धारणा क्षेत्र कमी होत आहे. त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. शेतीमधील बहुतांशी काम यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने करायला हवीत. यासाठीच आत्माच्या माध्यमातून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामुग्रीचा वापर करायला हवा. यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते. त्यातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. मात्र या वाढलेल्या उत्पन्नातून शेतकर्‍यांनी शेतीमधील गुंतवणूक वाढवावी.

यावेळी गावातील विविध कार्यकारी सहकारी सेवा समित्यांनी काही तरी उद्योग, व्यवसाय सुरू करावा. त्यामुळे गावातील तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ना. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे,  हणमंत कुलकर्णी यांची भाषणे झाली.

यावेळी शेतकर्‍यांना कृषी अवजारांचे  वितरण करण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर, कृषीपंप आणि पीव्हीसी पाईप यांचा समावेश होता. त्याचबरोबर तूर खरेदी केंद्रात तुरीच्या पोत्यांचे सहारमंत्री देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.