Mon, Apr 22, 2019 04:24होमपेज › Solapur › सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा

सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात  मोठी क्रांती  झाली आहे. या क्रांतीमुळे उदयास आलेल्या समाज माध्यमांद्वारे सर्वांना  माहितीचे दार  खुले  झाले आहे. मात्र समाज माध्यमांचा वापर करताना आवश्यक सावधानता बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांचा वापर अविवेक वृत्तीने होऊ नये, यासाठी जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. जागृतीसाठी  पत्रकार व या क्षेत्रातील जाणकारांनी काम करावे. सोशल मीडियाचा वापर समाजहितासाठी व्हावा, अशी अपेक्षा सायबर सुरक्षा जाणीव जागृती कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

सोलापूर  शहर    पोलिस आयुक्तालय  येथील  सभागृहात  पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या समन्वयाने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

या कार्यशाळेचे उद्घाटन पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी केले. यावेळी ग्रामीण  पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस आयुक्तालयाच्या सहायक पोलिस निरीक्षक मधुरा भास्कर, माहिती सहायक एकनाथ पोवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी म्हणाल्या, इंटरनेटच्या युगात सध्या सायबर दहशतवाद वाढत आहे. अशिक्षित लोकांबरोबरच शिक्षित लोकदेखील सायबर गुन्ह्यांमध्ये फसलेले दिसत आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून ते काम प्रसारमाध्यमांकडून केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक मधुरा भास्कर म्हणाल्या, इंटरनेटने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी, मेसेज पाठवणे, ई-गव्हर्नन्स, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, व्टिटर, व्हीडीओ कॉल यामुळे जगातले लोक खूपच जवळ आले आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर क्षेत्रातील गुन्हेगारांनी नवीन कल्पना शोधून लोकांचा पैसा आणि गोपनियतेला धोका निर्माण केला आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात सायबर पोलिस स्टेशन निर्माण करण्यात आले आहेत.  इंटरनेट, समाज माध्यम वापरकर्ते यांनी या माध्यमांचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपली कोणतीही गोपनीय  माहिती त्रयस्त व्यक्तीला देऊ नये.

सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड म्हणाले, सध्या बँकिंग क्षेत्रात सर्वच व्यवहार ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. आपले मोबाईल क्रमांक, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक केले असल्याने ऑनलाईन व्यवहार करताना याबाबत अधिक जागरुक व दक्ष राहणे गरजेचे आहे. फसव्या जाहिरातीला आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करुन गायकवाड म्हणाले, नागरिकांनी आपली गोपनिय माहिती, एटीएम पासवर्ड कोणालाही देवू नये. अशा प्रकारच्या माहितीची मागणी केल्यास संबंधित बँकेत संपर्क साधावा किंवा सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी.
राज्यात  43 सायबर पोलिस ठाणे, तर 47   सायबर  लॅब  कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कायदा अस्तित्वात आला असल्याचे सांगून सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड म्हणाले, या कायद्याच्या जनजागृतीसाठी पत्रकारांनी सतत लिखाण करावे. आपली सामाजिक जबाबदारी समजून या कायद्याची जनजागृती करावी. यावेळी त्यांनी सायबर कायद्यातील विविध कलमांची माहिती दिली.