Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Solapur › विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे

विद्यापीठ नामांतराबाबत न्यायालयाचा निर्णय मान्य करणार : प्रा. मनोहर धोंडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरविरोधात शिवा संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतली असून नामांतरास पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती मिळाली आहे. नामांतराबाबत न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू, असे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत  सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी 5 नोव्हेंबर 2017 रोजी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. यानंतर नामांतराबाबत मंत्री गटाची उपसमिती गठीत करण्याचा शासन निर्णय 3 मार्च रोजी घेण्यात आला. या निर्णयाविरोधात तसेच सोलापूर विद्यापीठाने 19 डिसेंबर रोजी नामांतराबाबत केलेल्या ठरावाविरोधात शिवा संघटनेने 15 मार्च रोजी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्या. रणजित मोरे व न्या. साधना जाधव यांच्यासमोर 22 मार्चच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी वेळ वाढवून मागितली, पण विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने एका दिवसाची वेळ वाढवून दिली.

23 मार्चच्या सुनावणीवेळी शिवा संघटनेचे वकील सतीश तळेकर यांनी याचिकेचा निकाल लागेपर्यंत नामांतराबाबत सरकारने कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी अंतरिम स्थगिती देण्यासाठी युक्तिवाद केला. यावर सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी एक महिन्याचा अवधी वाढवून मागितला असता अ‍ॅड. तळेवकर यांनी आक्षेप घेतला. विधीमंडळ अधिवेशन चालू असल्याने नामांतराचे विधेयक मंजूर करण्याचा घाट सरकारने घातल्याचे सांगत त्यांनी अंतरिम स्थगितीची विनंती केली. यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना पुढील सुनावणीपर्यंत सरकार नामांतराबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, या अटीवर तारीख वाढवून दिली. पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे, असे धोंडे यांनी सांगितले.

10 मार्च 2004 रोजी सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाची घोषणा केली होती. यानंतर शिवा संघटनेने त्यांची भेट घेऊन विद्यापीठाला महात्मा बसवेश्‍वर किंवा सिद्धेश्‍वर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली होती, पण विद्यापीठाची विद्या परिषद स्थापन न झाल्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. असे असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक हा दोन समाजांचा वाद नाही. शिवा संघटना न्यायालय जे निर्णय देईल, त्यास बांधील राहणार आहे. नामांतराच्या घोषणेनंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील नामांतराचा ठराव हा नियमबाह्य आहे, असे धोंडे यावेळी म्हणाले. 
लिंगायत तसेच वीरशैव लिंगायतला अल्पसंख्याकचा दर्जा देण्याची कर्नाटक सरकारची शिफारस हास्यास्पद आहे. देशात सहाच धर्म असून नवीन धर्माला मान्यता देण्याचा निर्णय केंद्राने याआधीच घेतला होता. लिंगायत हा वीरशैवाचा प्रचलित शब्द आहे. असे सांगत लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अथवा अल्पसंख्याकचा दर्जा देण्यास शिवा संघटनेचा विरोध आहे, असे सांगत महाराष्ट्र सरकारनेही 2014 मध्ये कर्नाटकासारखी शिफारस केली होती, पण तसे करता येत नसल्याचे पत्र केंद्राकडून देण्यात आले होते.

आता कर्नाटकाबाबतही असेच होणार आहे. लिंगायत समाजात मताच्या राजकारणासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्नाटकातील काँग्रेसची सरकारची सत्ता आगामी निवडणुकीत झाल्याशिवाय राहणार नाही, असेही धोंडे यांनी यावेळी सांगितले. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्‍वरांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी शिवा संघटनेचीच आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तशी घोषणा केली, पण त्याची अंमलबजावणी केली नाही. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हा प्रशासन याबाबत उदासीन आहे, असा आरोप करीत धोंडे यांनी स्मारकासाठी 62 एकर जमीन मिळण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला माजी कुलगुरू ईरेश स्वामी, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, माजी आ. विश्‍वनाथ चाकोते, वीरभद्रेश बसवंती, राजशेखर हिरेहब्बू, गुरुलिंग शिवाचार्य, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, नीलकंठ शिवाचार्य, रेणुक शिवाचार्य, बसवराज बगले आदी उपस्थित होते. 

Tags : Solapur, Solapur News, University, decision, change,  Pri Manohar Dhonde, Solapur University 


  •