Mon, Aug 19, 2019 05:39होमपेज › Solapur › विद्यापीठ, संघटना आणि वादाचे समीकरण

विद्यापीठ, संघटना आणि वादाचे समीकरण

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 8:58PMविद्यापीठातून : रणजित वाघमारे

जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ‘सोलापूर विद्यापीठ’ हे ‘वरदान’ आहे. परंतु त्याचे कौतुक ना विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना आहे ना ही येथील विद्यार्थी संघटनांना. त्यामुळे येथे घडलेल्या प्रत्येक घटना आणि प्रकारावर वाद ठरलेलाच. ज्यामध्ये विद्यार्थी संघटनांची टोकाची  ठाम भूमिका आणि विद्यापीठाची कोंडी हा ठरलेला विषय आहे. त्यामुळे सध्या ‘वाद, विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटना’ हे समीकरण सोलापूर विद्यापीठाला लागलेले दूषण आहे. 

राज्यात सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ म्हणून ‘सोलापूर विद्यापीठा’चा गाजावाजा झाला. तशी ही कौतुकास्पद गोष्ट. परंतु विद्यापीठ व येथील प्रशासनात काम करणारे अधिकारी-कर्मचारी हे तसे नवखेच. ते कार्यरत असताना कळत-नकळत चुका या होणारच. परंतु या चुकांचे राजकारण, त्यावर स्वत:च्या संघटनांची, स्वत:ची पोळी भाजून घेण्यातही या संघटना व त्यातील पदाधिकारी एकापेक्षा एक वरचढ आहेत. काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून पेपर फुटीचा प्रकार घडला. यावर एका संघटनेने दोषींवर कारवाई व फेरपरीक्षा घ्या अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. विद्यापीठ प्रशासनाने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. याच विषयावर दुसर्‍या संघटनेने फेरपरीक्षा रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. शेवटी कुलगुरुंनी ‘बेस्ट ऑफ टू’ची घोषणा करत फेरपरीक्षा पुढे ढकलली. मात्र या गोंधळात दोषींवर अजूनही कारवाई नाही. असाच प्रकार तंत्रनिकेतनमध्येही पाहायला मिळत आहे. 

डॉ. अनिल घनवट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बडतर्फ केले. 19 लाखांपर्यंत वसुलीचे आदेश दिले. त्याच डॉ. घनवट यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे पत्र एका संघटनेने कुलसचिवांना दिले आहे. मात्र या संघटनेने महिला छेडछाडीचे काळे प्रकरण, सीसीटीव्ही प्रकरण, जेवणात अळ्या निघणे यामध्ये सोयीस्कर भूमिका घेतल्याची चर्चा आहे.  बोगस पीएच.डी. प्रकरणी विद्यापीठालाच वेठीस धरत विद्यापीठाच्या पदवी प्रदान दिनादिवशीच उपोषण केले.  या सर्वात विद्यापीठाची बदनामी आणि विद्यापीठास वेठीस धरल्याचे दिसून येत आहे. याच पध्दतीने विविध विद्यार्थी संघटना अ‍ॅडमिशनसाठी कमी टक्केवारी पडलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन देण्यासाठी महाविद्यालयांना वेठीस धरत असल्याचे बोलले जाते. या प्रकाराला कंटाळून एका महाविद्यालयाने तर विद्यापीठानेच अ‍ॅडमिशन प्रक्रिया राबवण्याची विनंती केली. हा सर्व प्रकार पाहता विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थी हिताचे काम हाती घेऊन ‘वाद, विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटना...’ हे समीकरण कुठेतरी बदलायला हवे.