Tue, May 21, 2019 00:53होमपेज › Solapur › संशोधनातून विद्यापीठ व विद्यार्थी पुढे नेणार

संशोधनातून विद्यापीठ व विद्यार्थी पुढे नेणार

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

संशोधनातून विद्यापीठ आणि विद्यार्थी पुढे घेऊन जाणार, असे मत सोलापूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केले. राज्यपालांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मृणालिनी फडणवीस यांची नुकतीच घोषणा केली होती. त्यामुळे येथील कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी त्या रविवारी, सोलापूर विद्यापीठात दुपारी 12 वाजता आल्या होत्या. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉ. करमळकर यांनी पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन डॉ. फडणवीस यांचा सत्कार केला. तसेच डॉ. करमळकर यांचा गेल्या पाच महिन्यात सोलापूर विद्यापीठाची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल कुलगूरू डॉ. फडणवीस यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, परीक्षा व मुल्यमापन नियंत्रक बी. पी. पाटील,  वित्त व लेखाधिकारी बी. सी. शेवाळे, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, डॉ. सूर्यकांत कांबळे, प्रा. अंबादास भास्के आणि प्रा. मधुकर जक्कन यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी कौशल्यावर आधारीत शिक्षण देणार असून स्थानिक गरज ओळखून 25 कोर्स सुरू करणार  आहे. नॅकच्या अनुषंगाने काम करून विद्यापीठास पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार  तसेच त्यांनी येत्या काळात येथील महिलांची समस्या, विद्यापीठाची पाचशे एकर जागा, तेथील विकास, कंत्राटी कर्मचार्‍यांचा कायम करण्याचा प्रश्‍न व इतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.प्र. कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, यापुढेही पुणे विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाच्या बरोबर राहणार आहे. 

देवेंद्र फडणवीस फक्त आडनाव बंधू...

आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नातलग असल्याची चर्चा आहे, असा प्रश्‍न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच त्यांनी ‘आम्ही फक्त आडनाव बंधू. बाकी काही नाही.’ म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला. आणि प्रयत्नांच्या जोरावर विद्यापीठास पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags : Solapur, University, students, research, forward