Sat, Jul 20, 2019 09:03होमपेज › Solapur › जात-पात विसरुन एकमेकांना आधार!

जात-पात विसरुन एकमेकांना आधार!

Published On: Mar 21 2018 1:17AM | Last Updated: Mar 20 2018 11:45PMउपेक्षित हिंदू-मुस्लिम वृद्धांची अनोखी कहाणी
 

 सोलापूर इरफान शेख

जात-पात विसरून म्हातारपणी एकमेकांचा आधार होत, भीक मागून पोटाची खळगी कशीबशी भरत असल्याची माहिती अजगर अली जमादार व शांताबाई काटे यांनी दिली. पासपोर्ट  कार्यालयाशेजारी फूटपाथवर हिरवे कापड व चार बांबू वापरत एक छोटेसे घरकुल बांधले आहे. त्यामध्ये वृद्ध महिला व वृद्ध पुरुष हे दोघे कित्येक दिवसांपासून राहात आहेत. हे दोघे पती-पत्नी नसून फक्‍त एकमेकांचा आधार आहेत. अजगर अली जमादार व शांताबाई काटे अशी दोघांची नावे आहेत.

अजगर अली जमादार (वय 65) हे मुळचे मुरुमचे रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासून सोलापुरात भीक मागून पोटाची खळगी भरतात. मुलबाळ नाही.पत्नी होती परंतु तिचे पाच वर्षांपूर्वी  निधन झाल्याने अजगर अली एकटेच पडले. शरीरानेसुध्दा धोका दिला. गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून कुष्ठरोगाची लागण झाली. हाताची व पायाची बोटे झडली. काय काम करावे कळेनासे झाले. मजूर कामगार म्हणून आयुष्य काढले. परंतु हाता-पायाची बोटेच नसल्याने मजुरीदेखील करता येत नाही. शेवटी नाईलाजास्तव भीक मागण्याची पाळी अजगर अली यांच्यावर आली. चार वर्षांपूर्वी सोलापूर गाठले. शाहजहूर दर्ग्याशेजारी भीक मागण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपर्यंत एकटेच आयुष्य काढले. दोन वर्षांपूर्वी अजगर अली यांची ओळख कांताबाई काटे यांच्याशी झाली.

शातांबाई काटे (वय 62) या मुळच्या सोलापूरच्याच. एक मुलगा आहे. यार्डामध्ये हमाली करून जीवन जगतो. दारूचे व्यसन असल्याने आईचा त्याला विसर पडला. दारूच्या नशेत आईला ठार मारण्याचादेखील मुलाने प्रयत्न केला होता. पोटाला चिमटा घेऊन ज्यांनी मोठे केले व जग दाखवले त्या आईला व्यसनांध मुलानेच संपवण्याचा प्रयत्न केला होता.अजगर अली यांनी जात-धर्माचा अजिबात विचार न करता शांताबाई यांना आपल्या छोट्याशा इवल्यात आसरा दिला. गेल्या दोन वर्षांपासून  शांताबाई व  अजगर अली हे दोघे अर्ध्या भाकरीसाठी दिवसभर पायपीट करून भीक मागून पोटाची खळगी भरतात. एकीकडे जाती-पातीचे राजकारण सुरू आहे.परंतु या वृद्धांकडे पाहिल्यास यांनी काढीएवढादेखील जातीचा किंवा धर्माचा विचार केला नाही.आयुष्याचे उरलेले दिवस कसेबसे काढण्याचा प्रयत्न चालू आहे.