Fri, Dec 14, 2018 00:21होमपेज › Solapur › रंगाची नव्हे, इथे होते रक्‍ताची धुळवड(Video)

रंगाची नव्हे, इथे होते रक्‍ताची धुळवड(Video)

Published On: Mar 02 2018 7:23PM | Last Updated: Mar 02 2018 7:23PMमोहोळ : शंकर पवार

देशभरात होळीचा उत्‍साह शिगेला असतानाच काही ठिकाणी परंपरागत पद्धतीने धुळवड साजरी केली जात आहे. अशीच एक परंपरा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात आहे. इथे एकमेकांना दगडं मारून चक्‍क रक्‍ताची धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. गावातील जगदंबा मंदिरात खेळल्या जाणार्‍या परंपरेला एक इतिहास आहे.

सीना व भोगावती नदीच्या संगमावर वसलेल्या ४ हजार लोकसंख्येच्या भोयरे गावचे ग्रामदैवत जगदंबा माता आहे. गावाशेजारी असणार्‍या टेकडीवर हे मंदिर वसले आहे. या ठिकाणी परंपरेनुसार मोठ्या उत्‍साहाने धुळवड साजरी केली जाते. पण, या धुळवडीत रंग नाहीतर एकमेकांवर दगडं मारली जातात. 

गावातील तरुणांचा एक गट मंदिरावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो. त्यानंतर या दोन्‍ही गटांकडून एकमेकांवर दगड फेकले जातात. यात काहीजण जखमीही होता. त्यावेळी रक्‍त आले तर, जखमेच्या ठिकाणी मंदिरातील भंडारा लावला जातो. जखम झाली तरी कोणताही मोठा धोका होणार नाही, अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे. तसेच पिढ्यानपिढ्या साजरी होणार्‍या या धुळवडीत कधीही मोठा अपघात झाला नसल्याचेही गावकरी सांगतात. गावातील ही धुळवड राज्यात चर्चेचा विषय झाली आहे. राज्यभरातून लोक याठिकाणी धुळवड पाहण्यासाठी गर्दी करत असतात.