Mon, Mar 25, 2019 02:56
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ‘मातृवंदना’ योजनेतून सोलापुरातील गर्भवतींना ३ कोटींची मदत

‘मातृवंदना’ योजनेतून सोलापुरातील गर्भवतींना ३ कोटींची मदत

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:38PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

सोलापूर जिल्ह्यातील  14 हजार 810 गर्भवती मातांना ‘पंतप्रधान मातृवंदना’ योजनेतून 3 कोटी 81 लाख 83 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. गर्भधारणेपासून ते बाळंतपण व बाळाच्या लसीकरणापर्यंत टप्प्याटप्प्याने महिलांना पाच हजार रुपये देण्यात येत आहेत.

खासगी क्षेत्रात काम करीत असलेल्या गर्भवती मातांचे बाळंतपण सुखकर व्हावे तसेच बाळंतपणानंतरही चांगले आरोग्य लाभावे यासाठी ‘पंतप्रधान मातृवंदना’ योजना सुरु करण्यात आली आहे. गर्भधारणा झाल्यानंतर या योजनेतून महिलेस तिच्या आधार नोंदणीकृत बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले जातात. त्यानंतर गर्भधारणेच्या सहा महिन्यांतर दोन हजार रुपये व बाळ जन्मल्यानंतर त्याच्या पोषणासाठी दोन हजार रुपये, अशी एकूण पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 

कोणत्याही महिला घेऊ शकतात लाभ 

शहर व जिल्ह्यातील कोणत्याही महिला ‘पंतप्रधान मातृवंदना’ योजनेचा लाभ घेऊ शकतात. केवळ शासकीय सेवेत असलेल्या महिलांना हा लाभ घेता येत नाही. नावनोंदणी केल्यानंतर गर्भवती महिलांना तातडीने एक हजार रुपये मिळतात. गर्भवती महिलांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. या योजनेतून गर्भवती महिलांना  आर्थिक आधार तर मिळतोच शिवाय बाळाच्या संगोपनासाठीही काही पैसे मिळतात. या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी

‘पंतप्रधान मातृवंदना’ मागील वर्षभरापूर्वी सुरु करण्यात आली असली तरी या योजनेत फक्त ग्रामीण भागातील महिलांचा समावेश  आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका गर्भवती मातांची माहिती संकलित करुन जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठवतात. आरोग्य विभागाकडून ही माहिती ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर दाखल केली जाते. ही प्रक्रिया होताच गर्भवती महिलांना तातडीने लाभाची रक्कम देण्यास सुरुवात होते. गर्भवती मातांचे बँक खाते, आधार क्रमांक आदी माहिती आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांद्वारे संकलित होत असल्याने महिलांना सहजासहजी या योजनेेचा लाभ मिळतो.