Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Solapur › राष्ट्रवादी : सहा तालुक्यांच्या अध्यक्षपदाबाबत एकमत

राष्ट्रवादी : सहा तालुक्यांच्या अध्यक्षपदाबाबत एकमत

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 03 2018 9:23PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी माढा, माळशिरस, मोहोळ, सांगोला, बार्शी, करमाळा या सहा तालुक्यांच्या अध्यक्षपदाबाबत एकमत असून अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा येथे इच्छुकांची संख्या अधिक आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (ग्रामीण) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप वरपे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

वरपे हे 28 फेब्रुवारीपासून सोलापूर दौर्‍यावर आले आहेत. 1  मार्च रोजी त्यांनी सांगोला, माळशिरस, करमाळा, 2 मार्च रोजी माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपूरचा दौरा केला. शनिवारी मंगळवेढा, अक्कलकोटचा दौरा आटोपल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यातील 11 पैकी 9 तालुक्यांचा दौरा केला असून उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्याचा दौरा अद्याप करावयाचा आहे. पक्षाची ताकद जिथे आहे व जिथे नाही अशा ठिकाणी आपण पक्षाच्या बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांशी थेट संवादाबरोबरच ज्येष्ठांशी संघटनात्मक बाबींबर चर्चा केली. राज्यातील पक्षाच्या जिल्हा, शहर, तालुकाध्यक्षांच्या निवडणुका 4 मार्च रोजी होणार होत्या. मात्र, शनिवारी प्रदेशकडून ही निवडणूक 15 दिवस लांबणीवर टाकल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. नवीन निवडणूक कार्यक्रम होईपर्यंत विद्यमान पदाधिकारी काम पाहतील, असे वरपे म्हणाले. 

6 व 7 एप्रिलला ‘हल्लाबोल’

मराठवाड्यात पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात 6 व 7 एप्रिल रोजी हे आंदोलन घेणार असून सांगोला येथून सुरुवात करण्यात करण्यात येणार आहे.  या आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. शेतकरी, बेरोजगार, दलित, अल्पसंख्याक आदी घटक केंद्र व राज्यातील सरकारला खाली खेचण्यासाठी आतूर आहेत, असेही वरपे यांनी 
सांगितले.