Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Solapur › उमेश पाटील यांचा उपोषणाचा इशारा

उमेश पाटील यांचा उपोषणाचा इशारा

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 9:15PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेत विविध प्रश्‍न उपस्थित  केल्यानंतरही या प्रश्‍नांची दखल न घेतल्यमुळे सर्वसाधाण सभेपुर्वी जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा लेखी इशारा जि.प.सदस्य उमेश पाटील यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे बुधवारी समक्ष भेटून दिला. 

जि.प.समाजकल्याण अधिकारी एका गरिब नागरिकास कार्यालयात कोंडून ठेवतात. याप्रकरणी अधिकार्‍यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. समाजकल्याण अधिकारी अकार्यक्षम असतानाही त्यांची बदली करण्यात येत नाही. बोगस अपंग प्रमाणपत्र देउन बदली करण्याचे प्रकरणही दुर्लक्षित आहे. 

अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षें ठाण मांडून बसले आहेत, त्यांची बदलाी होत नाही. ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रीक मशीन बसविण्यात येत नाही. जिल्हा परिषदेची सुमारे एक हजार कोटी रुपयांची मालमत्‍ता गायब असतानाही ही मालमत्‍ता शोधून ताब्यात घेण्यात अजूनही यश आले नाही. 

जिल्हा परिषदेच्या वैयक्‍तिक लाभाच्या योजनेसाठी निधी खर्च होत नाही. जि.प.अध्यक्ष व खातेप्रमुखांचे नीट लक्ष नसल्याने जिल्हा परिषदेचा कारभार चुकीच्या दिशेने जात आहे. विविध प्रश्‍नाबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नसल्याने नाईलाजाने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. 

दरम्यान डॉ. भारुड यांनी मात्र उमेश पाटील यांची समजूत काढून उपोषणाच्या निर्णयापासून त्यांना परावृत्‍त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपस्थित केलेल्या बरेच विषय सोडवणूक करण्यात आले आहेत. कांही विषय सोडवणूक करायचे असून मार्च अखेर नंतर हे विषयही सोडवले जातील अशी भुमिका त्यांनी घेतली.