Wed, Apr 24, 2019 19:49होमपेज › Solapur › ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 9:15PM

बुकमार्क करा
उमरगा :  प्रतिनिधी 

तालुक्यातील जकेकूर चौरस्ता येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रगती इलेक्ट्रिकल वर्क्सच्या गोदामावर बंगळूरच्या केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने छापा टाकून 50 लाख रुपयांची अमली पदार्थाची मिथोक्युलोन पावडर व कच्चा माल जप्त केला. या गोदामाची रात्रभर पथकाकडून सखोल तपासणी सुरू होती. माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे 46 किलो अमली पदार्थाची पावडर पोलिसांनी जप्त केली होती. त्यानुसार पुढील तपास संबंधित यंत्रणेने केल्यानंतर चौकशीवेळी याचे धागेदोरे उमरगा येथील जकेकूर-चौरस्ता येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. 

प्राप्त माहितीनुसार बंगळूर येथील केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पंधरा कर्मचार्‍यांच्या पथकाने औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रगती इलेक्ट्रिकल वर्कच्या गोडावूनवर छापा टाकला असता त्याठिकाणी अमली पदार्थाच्या नशिल्या गोळ्या तयार करण्यात येणारे अर्धा किलो मिथोक्युलोन पावडर जप्त केली. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पन्नास लाख रुपये किंमत आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने कारवाई केलेले गोडावून पुणे येथील सुरेश राजनाळे यांच्या मालकीचे असून त्यांनी हे गोदाम संबंधित मेडिसिन कंपनीसाठी भाडेतत्त्वावर दिल्याचे समजते. स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक दिनेश जाधव हे पथकासोबत असून शनिवार संध्याकाळपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.