बेंबळे : प्रतिनिधी
पुणे व परिसरात पावसाने जोर धरल्याने बंडगार्डन आणि दौंड येथून येणार्या विसर्गात दोन दिवसांत पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने उजनी धरणात 120 टक्के पाणीसाठा झाला असून, उजनी धरण भरल्याने व वरील धरणांतून उजनीत होणारा विसर्ग वाढतच असल्याने आता उजनीतून भीमा नदीत 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग धरणाचे 8 दरवाजे 14 सें.मी. उचलून सोडण्यात आला आहे.
दरम्यान, या विसर्गात वाढ करावी लागणार असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 89 दिवसांत उजनीत 120 टक्के पाणीसाठा झाला आहे.
उजनी धरणातून सोमवारी सकाळीच भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केली. सकाळी 6 वाजता 2 हजार 500 क्युसेक, तर त्यात सकाळी 10 वाजता 2 हजार 500 ने वाढ करून तो विसर्ग 5 हजार क्युसेक करण्यात आला होता. दुपारी 4 वाजता त्यात 5 हजार क्युसेकने वाढ करून तो 10 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
हा विसर्ग धरणाचे 8 दरवाजे 14 सें.मी. उचलून सोडण्यात आला आहे.सोमवारी सकाळपासून दौंड येथून येणार्या विसर्गात वाढ झाल्याने वाढणार्या विसर्गाचा अन् भीमेत सोडण्यात येणार्या विसर्गाचा ताळमेळ बसविण्यासाठी पुन्हा रात्री भीमेतील विसर्गात वाढ करण्यात येणार आहे.
सध्या उजनी धरणातून भीमेत वीजनिर्मितीसाठी सोडलेला 1600 क्युसेक व भीमा नदीत 8 दरवाजांतून सोडलेला 10 हजार क्युसेक असा 11 हजार 600 क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे.
उजनीवरील 19 धरणांपैकी 14 धरणांतून 50 हजार 111 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडला आहे.
भीमाकाठच्या शेतकर्यांची पळापळ
उजनीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने भीमा नदीकाठी असलेल्या अनेक गावांतील हजारो शेतकर्यांची एकच धांदल उडाली. भीमा नदीवरून पाईपलाईन करून लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आतापर्यंत नदीला पाणी कमी कमी होत गेल्यामुळे सर्वांनी पाईप वाढवून विद्युत पंप नदीच्या पात्रात ठेवले होते. मात्र सोमवारी उजनीतून भीमेत पाणी सोडल्याने आपापल्या मोटार, पाईप, केबल काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी एकच धावपळ चालू झाली होती. प्रत्येक गावच्या नदीकिनारी जत्रेचे रुप आले होते.