Thu, Jul 18, 2019 00:04होमपेज › Solapur › उजनी १०० टक्के!

उजनी १०० टक्के!

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 10:12PM बेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने यंदा गतवर्षीच्या तुलनेत 3 दिवस अगोदरच शंभरी गाठली आहे. कधी जलद, तर कधी संथ गतीने का होईना, रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उजनी धरण 97.13 टक्के भरल्याची नोंद झाली होती. तर, रात्री बारा वाजेपर्यंत उजनी 100 टक्के भरलेले असेल, असा विश्‍वास उजनीच्या अभियंत्यांनी व्यक्‍त केला आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपासून दौंड येथून येणार्‍या विसर्गात घट झाली  होती. त्यामुळे उजनी भरण्यास आणखी तीन ते चार दिवस लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु रविवारी सकाळी पुन्हा एकदा दौंड येथून येणार्‍या विसर्गात वाढ करण्यात आल्याने उजनी रविवारी रात्री 100  टक्के भरले आहे.   वरील धरणांमधून विसर्गात वाढ झाल्यास उजनीतून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सध्या दौंड येथून 28 हजार 406 क्युसेक, तर बंडगार्डन येथून 27 हजार 627 क्युसेकने उजनीत विसर्ग सुरू आहे. उजनी भरल्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासह शेतकरी, उद्योजक, कारखानदारांचा जीव भांड्यात पडला आहे.     38 वर्षांत 30 वेळा शंभर टक्के गतवर्षीच्या तुलनेत उजनीने 3 दिवस अगोदर शंभरी गाठली आहे.उजनी धरणाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या 38 वर्षांत 30 वेळा धरण 100 टक्के भरले आहे. उजनीचे जलसंपदा शास्त्र उगम क्षेत्रातील पावसावर अवलंबून आहे. म्हणजे उजनी वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे. त्या धरणातून आलेल्या पाण्यामुळे धरण भरले जाते, पण 2009 मध्ये केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसावर उशीरा का होईना धरण 100 टक्के  भरले होते. त्यावेळी वरील धरणातून उजनी धरणात एक थेंबही पाणी आले नव्हते.

 मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण

उजनी धरणाच्या परिक्षेत्रात 500 मिमी पाऊस व भीमा नदी उगम परिसरातील 19 धरणे व त्यावरील 4 हजार 320 मिमी पावसाच्या अवलंबतेवर उजनीचे जलसंपदा शास्त्र निर्माण केले आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील उपयुक्त साठ्याबाबत जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून, मृतसाठ्यात मात्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 3 हजार 320 दलघमी (123 टीएमसी), तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता 1517.19 द.ल.घ.मी. व मृतपाणीसाठवण क्षमता 1802.81 द.ल.घ.मी. उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा (53.57 टीएमसी) मृतसाठा(63.65 टीएमसी) मोठा असलेले उजनी हे महाराष्ट्रातील  एकमेव धरण आहे.

या धरणाचे पाणलोट क्षेत्र हे 14856 चौ.कि.मी. असून या धरणाखाली 29000 हेक्टर क्षेत्र, 51 गावे (पुणे-25, सोलापूर-23, तर अहमदनगर- 3) बुडाली आहेत.