Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Solapur › उजनी पाणी वाटप; सत्ता बदलली की निकष बदलले    

उजनी पाणी वाटप; सत्ता बदलली की निकष बदलले    

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 11 2018 10:19PMबेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे

उजनी धरण संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणापेक्षा उजनी मोठे धरण असून मृतसाठ्याबाबतही राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणून  गणले जाते. कित्येकवेळा उजनी धरणावरून सोलापूर आणि पुणे  जिल्ह्याचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण बदलत असते.

खरे  तर उजनी धरणाची निर्मितीच सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात आली होती. पण या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम सध्याच्या राजकारणाने केले आहे. सत्ता बदलली की उजनी पाणी वाटपाचे निकष आणि निर्णय बदलले जातात. उजनी धरण निर्मिती हे एक शेती व शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले होते. पण सध्या शासनाचे बदलणारे निर्णय आणि निकष व जलप्रदूषण हा एक शाप ठरतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.   

उजनी येथे उभारण्यात आलेल्या धरणाला मान्यता व उभारणी “बा, विठ्ठला मला माफ कर, मी तुझी चंद्रभागा अडवतोय, या गरीब शेतकर्‍यांच्या शेतात जा अन् त्यांना समृद्ध कर”, अशी विठ्ठलाची माफी मागून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भीमा (चंद्रभागा)  नदीला  माढा तालुक्यातील उजनी येथे अडवून धरणाची निर्मिती केली. म्हणून याला यशवंत जलाशय हे नाव दिले गेले. या निर्मितीसाठी जिल्ह्यातील अनेक बुजूर्ग आमदार नेतेमंडळींचेही योगदान लाभले. 

सर्वसाधारणपणे 1968 च्या दरम्यान विद्यापीठ व धरण निर्मितीची प्रक्रिया चालू होती. त्यावेळी शिवाजी विद्यापीठ सोलापूर येथे उभे करण्याचा मानस होता. त्यावेळी जिल्ह्यातील तत्कालीन आमदारांना विचारणा केल्यानंतर पंढरपूरचे तत्कालीन  आ. औदुंबरआण्णा पाटील, माढ्याचे आ. भाई एस.एम. पाटील, माळशिरसचे आ. शंकरराव मोहिते-पाटील, करमाळ्याचे आ. जगताप, के. जी.  कांबळे, विठ्ठलराव शिंदे यांनी आधी धरण, पुन्हा विद्यापीठ ही मागणी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर लावून धरली.

त्यामुळे विद्यापीठाऐवजी उजनी धरणाची निर्मिती झाली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याची हरितक्रांतीकडे वाटचाल सुरु झाली. यशवंतराव चव्हाण यांनी विद्यापीठाऐवजी धरण मागणारा नेता म्हणून आ. औदुंबरआण्णांचा उल्लेख आपल्या भाषणात अनेक वेळा केला. उजनी धरणाच्या बांधकामाला 1969 मध्ये प्रारंभ झाला. या प्रकल्पासाठी सुरुवातीला 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र उजनी धरण पूर्णत्वास येण्यास 96.77  कोटी रुपये लागले होते. सतत 11 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 1980 मध्ये उजनी पूर्णत्वास आली. तत्कालीन मुख्यमंत्री   वसंतदादा पाटील यांनी 27 सप्टेंबर 1980 रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण केले आणि पहिल्यांदा 1981 पासून उजनीत प्रत्यक्षात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.

उजनी धरणाच्या परिक्षेत्रात 500 मिमी पाऊस व भीमा नदी उगम परिसरातील 19 धरणे व त्यावरील 4,320 मिमी पावसाच्या अवलंबतेवर उजनीचे जलसंपदा शास्त्र निर्माण केले आहे.  उजनी हे भीमा बेसीनमधील चार उपविभागापैकी तीन उपविभागातील 18 धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पडणार्‍या पावसाच्या अवलंबतेवर निर्माण केले गेले आहे.

उपविभाग व त्यावरील धरणे पुढीलप्रमाणे.

1. मुळामुठा बेसीन....धरणे - वरसगाव, पानशेत, टेमघर, खडकवासला, मुळशी, पवना, कासारसाई.
2. भीमा बेसीन...धरणे- चसकामान, आंध्र, भामाआसखेड, वडिवले.
3. कुकडी (घोडबेसीन)...धरणे- येडगाव, माणिकडोह, डिंभे, पिंपळगावजोगे, घोडविसापूर. 

उजनी धरण हे महाराष्ट्रातील उपयुक्त साठ्याबाबत जायकवाडी व कोयना धरणापेक्षा सर्वात मोठे धरण असून, मृत साठ्यातही  महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. 
धरणाचे पाणलोट क्षेत्र 14 हजार 856 चौ.कि.मी. या धरणाचे पाणलोट क्षेत्र हे 14856 चौ.कि.मी. असून या धरणाखाली 29 हजार हेक्टर क्षेत्र बुडले असून यात 605 हेक्टर वन क्षेत्र, 26 हजार 750 हेक्टर खासगी क्षेत्र, तर 1 हजार 645 हेक्टर सरकारी क्षेत्र, पाण्यााखाली आले आहे.  तर 51 गावे (पुणे 25, सोलापूर 23, तर अहमदनगर जिल्ह्यातील- 3 गावे पाण्याखाली आली आहेत. या 51 गावातील 47 हजार लोक बाधीत (बेघर) झाली होती.

साठवण क्षमता 3 हजार 320 दलघमी

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 3 हजार 320 द.ल.घ.मी. (123 टीएमसी), तर उपयुक्त पाणी साठवण क्षमता 1517.19 द.ल.घ.मी. व मृत पाणीसाठवण क्षमता 1802.81 द.ल.घ.मी. इतकी आहे. उपयुक्त पाणी साठ्यापेक्षा (53.57 टीएमसी)  मृतसाठा (63.65 टीएमसी) मोठा असलेले उजनी हे महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे.