होमपेज › Solapur › ‘उजनी’त चोवीस तासांत ५.२० टीएमसी जलसाठा

‘उजनी’त चोवीस तासांत ५.२० टीएमसी जलसाठा

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:42PMबेंबळे : वार्ताहर

उजनी धरणाने मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला आहे. धरण  प्लसमध्ये आल्यानंतर 24 तासांत जवळपास 10 टक्क्यांहून अधिक पाणी धरणात आले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास 5.20 टीएमसी पाणी जमा झाले आहे. मात्र, बंडगार्डन व दौंड येथील विसर्ग कमी झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण वेगाने भरत असल्याचे दिसत आहे. पाऊस कमी-जास्त होत असल्याने या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीप्रमाणे जुलै महिन्यात उजनीने प्लसमध्ये प्रवेश केल्याने उजनी धरण 100 नव्हे, 110 टक्के भरण्याची आशा पल्लवीत झाली आहे. 

सर्वसाधारणपणे उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो. 2016 मध्ये उजनी धरण हे 5 ऑगस्ट रोजी, तर 2017 मध्ये 20 जुलै रोजी प्लसमध्ये आले होते. यंदा त्याहीपेक्षा लवकर धरण प्लसमध्ये आले आहे. मंगळवारी उजनीतून भीमा नदीत आषाढी वारीसाठी सोडण्यात आलेले पाणी पूर्ण बंद केले आहे.उजनीचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केल्याने उजनी मायनस पातळीत फक्‍त -19.82 टक्के खाली आले होते. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर निसटला आहे.

त्यात उजनीत येणार्‍या विसर्गात मोठी वाढ होत आहे. खडकवासला व त्यावरील साखळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावत त्यात सातत्य राहिल्याने खडकवासला 100 टक्के भरले आहे. तीन दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उजनी धरणात येणार्‍या विसर्गात वाढ होणार आहे. दौंड येथून येणार्‍या विसर्गात मंगळवारी घट झाली होती. पण वरील धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे घटलेला विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. 

सध्या बंडगार्डन येथून 8436 क्युसेक, तर दौंड येथून 38911 असा विसर्ग येत आहे. आजपर्यंत उजनीत फक्त भीमा खोर्‍यातील लोणावळा, खेड, मावळ, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागांत पडत असलेल्या पावसाचे पाणी येत होते. परंतु आता खडकवासला प्रकल्प साखळीतील खडकवासला धरणातून पाणी येत असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.उजनी धरण व त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून त्याचा परिणाम दौंड व बंडगार्डन येथून येणार्‍या विसर्गात वाढ कमी-जास्त होत आहे. त्यामुळे उजनी धरणाचा मायनसचा विळखा  सुटला आहे.  आता येणार्‍या पाण्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा वाढत आहे.

गेल्या 24 तासांत धरणात 10 टक्के पाणी जमा झाले असून धरणात पाणी येण्याचा वेग असाच कायम राहिला तर उजनी धरण 15 ते 20 दिवसांत ओसंडून वाहिल्याशिवाय राहणार नाही. उजनी प्लसमध्ये आल्यानंतर एका दिवसात 10 टक्के झाल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्‍त होत आहे.

पाणीपातळीची सद्यःस्थिती

एकूण पाणीसाठा ः 491.750 मी.
एकूण पाणीपातळी ः 1949.94 द.ल.घ.मी.
उपयुक्‍त पाणीपातळी ः 147.06 द.ल.घ.मी. 
टक्केवारी ः प्लस 9.70 टक्के
उजनीतून भीमा नदी विसर्ग बंद
बंडगार्डन येथून 8436 क्युसेक विसर्ग
दौंड येथून 38911 क्युसेक विसर्ग