Wed, Jul 17, 2019 18:51होमपेज › Solapur › ‘उजनी’चा वीजपुरवठा खंडित; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

‘उजनी’चा वीजपुरवठा खंडित; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 29 2018 12:37AMसोलापूर : प्रतिनिधी

उजनी धरणाजवळील महापालिका पंपगृहाचा वीजपुरवठा 12 तास खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, उजनीतून औज बंधार्‍यासाठी  पाणी सोडण्याचा निर्णय अद्याप न झाल्याने मनपा प्रशासन चिंतीत आहे. तर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ बसपच्या नगरसेवकांनी पाण्याच्या बाटल्यांचा हार पालिका उपायुक्तांच्या नामफलकास घातला. 

अवकाळी पाऊस, वादळ आदी कारणांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची घटना गेल्या महिन्याभरापासून घडत आहे. यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वी दिवसांपूर्वी अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी शटडाऊन घ्यावा लागल्याने शहराला ऐन उन्हाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा झाला. गत आठवड्यापासून पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गावठाण भागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी हद्दवाढ भागात मात्र चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मोठी ओरड होत आहे. शुक्रवारी झालेल्या मनपा सभेत एमआयएमच्या नगसेवकांनी नई जिंदगीसह हद्दवाढच्या काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबद्दल सभागृहाचे लक्ष वेधले होते. शहरातील अनेक भागांत अशीच स्थिती असल्याची तक्रारही अनेक नगरसेवकांनी केली होती.

या पार्श्‍वभूमीवर उजनी पंपगृहाचा वीजपुरवठा रविवारी रात्री आठ वाजता अचानक खंडित झाला. त्यामुळे पाणी उपशावर परिणाम झाला. सोमवारी सकाळी 8 वाजता पंपगृहाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला.  तब्बल 12 तास याठिकाणी बत्ती गुल झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उजनी लाईनवरुन पाणीपुरवठा होणार्‍या अनेक नागरी वसाहतींना सोमवारी होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबद्दल प्रशासनाला जबाबदार धरत बसपाच्या नगरसेवकांनी उपायुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या नावाच्या पाटीला रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला.

उजनी पंपगृहावरील वीज 12 तास खंडित झाल्याने सोमवारचा नियोजित पाणीपुरवठा उशिरा किंवा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याची माहिती मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.

उजनीतून पाणी सोडण्याची प्रतीक्षा
दरम्यान, औज बंधार्‍यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अजून न झाल्याने मनपा प्रशासन चिंतीत आहे. उजनीतू पाणी सोडण्याच्या प्रतीक्षेत प्रशासन आहे. टाकळी येथील जॅकवेलमध्ये पाण्याची लेवल चार फूट असून हे पाणी जेमतेम आठ ते दहा दिवस पुरणारे आहे. हे लक्षात घेता उजनीतून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्यास पाणीपुरवठा चार दिवसाआड करण्याची वेळ येणार आहे. यासंदर्भातील नियोजन करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता दुलंगे यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वादळी वारे, पावसाने वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठ्याबाबत महापालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.