होमपेज › Solapur ›  सोलापूरकरांचे जलसंकट टळले!

‘उजनी’तून भीमा नदीत पाणी सोडले

Published On: May 29 2018 10:51PM | Last Updated: May 29 2018 10:48PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून मंगळवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले. धरणाच्या मृतसाठ्यातील गाळमोरीतून सहाशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग आठ हजारांवर वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, पाणी सोडल्याने शहराला भासणारी पाणीटंचाई दूर होणार असून तूर्त तरी जलसंकट टळले आहे. औज बंधार्‍यातील जलसाठा संपला की उजनीतून पाणी सोडण्याची प्रतीक्षा शहराला करावी लागते.

महापालिका प्रशासनाकडून याबाबत पाटबंधारे विभागाकडे वेळीच पाठपुरावा केला जातो. मात्र, शासन स्तरावर निर्णय होत असल्याने पाणी सोडण्याविषयी प्रतीक्षा करावी लागते. दहा दिवसांपूर्वी औज बंधारा कोरडा पडला होता. टाकळी येथील जॅकवेलमध्ये लेव्हल बर्‍यापैकी असल्याने 15 दिवसांपर्यंत पाणी पुरणारे होते. दरम्यान, उजनीतून वेळेवर पाणी न सोडल्यास तीव्र पाणीटंचाई भासून शहराला तीनऐवजी चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार  होती. सध्या उपलब्ध असलेले पाणी आठ ते दहा दिवस पुरणार असल्याने उजनीतून तातडीने पाणी सोडण्याची गरज होती. कारण, उजनीचे पाणी औज बंधार्‍यापर्यंत येण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा अवधी लागतो.

रविवारी उजनी पंपगृहावरील बत्ती 12 तासांपर्यंत गुल झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. एकीकडे विजेचा प्रश्‍न, तर दुसरीकडे कोरडा पडलेला औज बंधारा यामुळे प्रशासन चिंतीत होते. पाणीटंचाईची तीव्र शक्यता निर्माण झाल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून पाणी सोडण्याची मागणी मंगळवारी केली. ना. महाजन यांनी ही मागणी मान्य करीत  पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उजनीतून पाणी सोडण्यात आले. सध्या उजनी मायनसमध्ये असल्याने दरवाजे उघडून पाणी सोडणे अशक्य होते. त्यामुळे गाळमोरीतून पाणी सोडावे लागले. सहाशे क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आला. टप्प्याटप्प्याने विसर्ग आठ हजारांपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस.एस. म्हेत्रे यांनी दिली.