होमपेज › Solapur › पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते उजनी धरणातील पाण्याचे पूजन

पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते उजनी धरणातील पाण्याचे पूजन

Published On: Sep 01 2018 5:24PM | Last Updated: Sep 01 2018 5:23PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या उजनी धरणात यंदा पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने १०६.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्याचे जलपूजन पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत, अधिक्षक अभियंता धीरज साळे, सोलापूर भिमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक, शेती व पिण्याच्या पाणी वाटपाचे संतुलित नियोजन करणार आहे. पुणे, पिंपरी येथून उजनी धरणात सोडण्यात येणारे पाणी प्रदुषण मुक्त करण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उजनी धरण १०६ टक्के भरले आहे. त्यामुळे सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. सध्या शहराला तीन आणि चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या पाण्याचे योग्य नियोजन करून शहराला लवकरच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. 

तर सोलापूर शहरासाठी नेमके किती पाणी लागते याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. त्याचे नियोजन झाल्यास शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी उजनी धरण जलाशयाची पाहणी केली. धरणातील पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांसह बळीराजाही समाधानी असल्याचे सांगितले.