Sun, Mar 24, 2019 13:12होमपेज › Solapur ›  उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले

 उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 10:17PM बेंबळे : वार्ताहर
उजनी धरणातून शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी आठ दिवसांपासून बंद होते. आता हे पाणी पुन्हा 1 हजार 550 क्युसेकने सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्‍त होत आहे.
उजनी धरणातून कालव्याद्वारे मंगळवारी पहाटे 2 वाजता 350 क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यात पहाटे 5 वाजता  900 ने वाढ केली. पुन्हा सकाळी 10.30 वाजता 400 क्युसेक्सने वाढ करत तो 1 हजार 550 क्युसेक करण्यात आला.

उजनी कालव्यातून इतक्या लवकर कसे पाणी सोडले, असे विचारले असता धरण प्रशासनाने गेल्या पाणी पाळीत उजव्या कालव्याचे पाणी 15 एप्रिलला बंद केले होते. त्यामुळे त्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसाठी हे आवर्तन लवकर सोडले असल्याचे सांगितले. 15 मार्चला कालव्याद्वारे 2500 ते 3000 क्युसेकने सोडलेले पाणी तब्बल 45 दिवसांनी म्हणजे 1 मेला बंद केले. पाणी बंद करून आठ दिवस होण्याअगोदर पुन्हा कालव्यातून पाणी सोडले. शेतीसाठी पाण्याची गरज सध्या भीमा नदीकाठच्या शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे. भीमा नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून भीमेचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे.

उजनी धरणात सध्या 14.99 टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी उजनीत उपयुक्‍त पाणी  जास्त आहे. गतवर्षी उजनीची पाणीपातळी वजा 12 टक्क्यांवर गेली होती. उजनीत सध्या 71.65 टीएमसी  एकूण पाणीसाठा आहे. त्यातील केवळ 8 टीएमसी पाणी उपयुक्त आहे. मृतसाठा 63.65 टीएमसी आहे. शेतीसाठी पाणी सोडल्याने याचा पिकांना चांगला फायदा होणार असल्याने शेतकरी बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.