Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Solapur › टेंभुर्णीजवळील अपघातात वाखरीचे दोन युवक ठार

टेंभुर्णीजवळील अपघातात वाखरीचे दोन युवक ठार

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 11 2018 12:16AM टेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर   अकोले बु. (ता. माढा) येथे इंडिगो कार व  मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात वाखरी (ता. पंढरपूर)  येथील दोन युवक ठार झाले. ही घटना गुरुवारी दुपारी 12.30 वा. सुमारास घडली आहे. सागर शरद माने (वय 26) आणि त्याचा मित्र सुहास दादासाहेब शिंदे (28, दोघेही रा. वाखरी) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. सागर माने व सुहास शिंदे हे दोघे मोटारसायकलवरून पंढरपूरला निघाले होते. ते माढा तालुक्यातील अकोले बु. येथे आले असता त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणार्‍या इंडिगो कारने  जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माने हा जागीच ठार झाला, तर शिंदे हा अकलूजकडे उपचारास घेऊन जात असताना वाटेत मृत झाला. जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी विव्हळत पडून होते. यानंतर त्यांना हलविण्यात आले.

शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे हेकॉ दिलीप केंगार व पोकॉ भोये यांनी घटनास्थळी भेट दिली.अपघाताची फिर्याद सुरेश माने यांनी दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार कारचालक रणजित राजू बुधनेर (रा. नारायणचिंचोली, ता. पंढरपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूचे  वृत्त समजताच वाखरीत हळहळ व्यक्‍त होत असून गावावर शोककळा पसरली 
आहे.