Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Solapur › औरंगाबादेतील दोन वाघ येणार सोलापूरला

औरंगाबादेतील दोन वाघ येणार सोलापूरला

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 8:57PMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

औरंगाबाद प्राणीसंग्रहालयातील दोघ वाघ सोलापूर प्राणीसंग्रहालयात येण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीनेच याबाबत औरंगाबाद महापालिकेला तशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार औरंगाबाद  आयुक्तांकडून कायदेशीर बाबी पूर्ण होताच हे दोन वाघ सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. सोलापूर महापालिकेअंतर्गत असणार्‍या प्राणीसंग्रहालयाला अनेक वर्षांपासून वाघांची प्रतीक्षा होती. वाघांसाठी पिंजरेही तयार करण्यात आले आहेत. मात्र झू अ‍ॅथॉरिटीच्या नियमानुसार स्वीकारण्यात येणार्‍या प्राण्यांच्या बदल्यात संबंधित प्राणीसंग्रहालयाकडे दुसरे प्राणी देण्याचे नियम आहेत. सोलापूर प्राणीसंग्रहालयाकडे स्वीकारण्यात येणार्‍या प्राण्यांच्या बदल्यात देण्यासाठी इतर प्राणी नसल्याने हा प्रश्‍न बिकट बनला होता. मार्चमध्ये नागपूर येथे झालेल्या झू अ‍ॅथॉरिटीच्या बैठकीत सोलापूर महापालिकेकडून दोन वाघ देण्याची विनंती करण्यात आली होती. या वाघांच्या बदल्यात सोलापूर प्राणीसंग्रहालयाकडे उपलब्ध असलेले पक्षी देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. त्यानुसार सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीने औरंगाबाद महापालिकेला सूचना देऊन दोन वाघ सोलापूरला देण्याचे आदेश दिले आहेत. 

औरंगाबादेत वाघांची संख्या वाढली

औरंगाबाद महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयात सध्या तब्बल नऊ वाघ आहेत. उपलब्ध जागा व पिंजर्‍यांचा विचार करता नियमानुसार तेथे केवळ सातच वाघ राहू शकतात. मात्र दीड वर्षांपूर्वी तेथे वाघाच्या तीन पिलांनी जन्म घेतल्यामुळे ही संख्या नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे आता सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीने यातील दोन वाघ सोलापूरला हलविण्याची सूचना केली आहे. 

सोलापूर महापालिकेने केली मागणी

सोलापूर महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयाने झू अ‍ॅथॉरिटीकडे वाघांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार झू अ‍ॅथॉरिटीने हे दोन वाघ सोलापूरला देण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या प्राणीसंग्रहालय प्रशासनाकडून आयुक्तांना तसा प्रस्ताव देण्यात आला असून कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण होताच हे दोन वाघ सोलापूरला मिळणार आहेत. सध्या तेथे असलेल्या नऊ वाघांपैकी सात वाघ हे पिवळे व दोन पांढर्‍या रंगाचे आहेत. त्यापैकी कोणते वाघ सोलापूरला मिळणार, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. 

औरंगाबादेत जन्मले 18 वाघ

देशात वाघांची संख्या झपाट्याने घटत असताना औरंगाबादेत मात्र चित्र वेगळे आहे. तेथे वीस वर्षांत तब्बल वीस वाघ जन्मले आहेत. त्यातील आठ वाघ यापूर्वी विविध ठिकाणी देण्यात आले आहेत. सोलापुरातही प्राण्यांची निगा चांगल्या पद्धतीने राखली गेल्यास वाघांची पैदास वाढण्यास मदत होणार आहे.