Tue, Jul 23, 2019 10:38होमपेज › Solapur › एस. टी.- दुचाकी अपघात; कामतीजवळ दोघे ठार

एस. टी.- दुचाकी अपघात; कामतीजवळ दोघे ठार

Published On: Apr 29 2018 12:32AM | Last Updated: Apr 29 2018 12:32AMसोलापूर :  प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील कुरुल ते कामती या रोडवर सोलापूरहून तिर्‍हेमार्गे पंढरपूरला जाणार्‍या एस.टी. बसने करकंबवरून सोलापूरकडे जाणार्‍या दुचाकीला समोरून जोरात धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला.  ही घटना परमेश्‍वरपिंपरी गावाच्या शिवारात वाघमोडे वस्तीजवळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

दत्तू वामन देवकते ( वय 35 , रा. पांढरे वस्ती, करकंब, ता. पंढरपूर) व शरणप्पा म्हाळप्पा कोकरे  (वय  28, रा. रामनगर, मनूर, ता. अफझलपूर, जि. गुलबर्गा) अशी मृतांची नावे आहेत.  याबाबत 
सविस्तर माहिती अशी की, दत्तू वामन देवकते हे आपल्या मोटारसायकलवरून करकंबवरून आपले कर्नाटकातील नातेवाईक शरणप्पा म्हाळप्पा कोकरे  यांच्यासह करकंबवरून नातेवाईकाच्या तिसर्‍या दिवसाच्या विधीसाठी सोलापूरकडे चालले होते.

याचदरम्यान पंढरपूर आगाराची बस  (एमएच - 14 बी टी 0948) सोलापूरवरून पंढरपूरकडे निघाली होती. या बसने वाघमोडे वस्तीजवळ वळणावर दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. यामध्ये  दुचाकीवरील दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला.  याचवेळी माजी आमदार दिलीप माने हे मोहोळ तालुक्यातील कामती येथे एका लग्नसमारंभासाठी जात होते. त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवून जखमींना आरोग्य केंद्रात नेण्यासाठी मदत केली.

रुग्णालयात रुग्णवाहिका नेहमीप्रमाणे उपलब्ध नव्हती. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता माजी आ. दिलीप माने यांनी आपल्या इनोव्हा गाडीतून त्या दोघांनाही तात्काळ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविले. माने यांनी त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून त्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीला धावले. या अपघातामुळे करकंब गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत कामती पोलिसांत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कामती पोलिस करत आहेत.
 

Tags : Two killed,  Accident, Kamati, Solapur