Thu, Jul 18, 2019 17:07होमपेज › Solapur › कल्याण पडाल आत्महत्या प्रकरणी दोन सावकरांवर गुन्हे

कल्याण पडाल आत्महत्या प्रकरणी दोन सावकरांवर गुन्हे

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 10:56PMकल्याण पडाल यांनी त्यांना होणारा सावकारापासूनचा त्रास एका अर्जामध्ये लिहून तो पोलिस आयुक्‍तांना दिला होता. 15 मे रोजी कल्याण पडाल यांनी आयुक्‍तालयामध्ये येऊन त्यांचा तक्रार अर्ज पोलिस आयुक्‍तांना दिला होता व त्याची पोच घेतली होती. त्या अर्जामध्ये कल्याण पडाल यांनी सावकारांच्या नावांचा, तसेच आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. वेळीच पोलिसांनी या तक्रारी अर्जाची तत्काळ चौकशी करून पडाल यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते, तर कदाचित आज कल्याण पडाल हे जिवंत दिसले असते.  
 

सोलापूर : प्रतिनिधी

‘म्होरक्या’ चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांना गळफास  घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा खासगी सावकारांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल होताच दोन्ही सावकार पसार झाले आहेत. श्रीनिवास संगा, संतोष बसुदे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कल्याण पडाल यांची पत्नी रेणुका कल्याण पडाल (रा. न्यू पाच्छा पेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कल्याण पडाल यांनी त्यांच्या आजारपणात श्रीनिवास संगा व संतोष बसुदे यांच्याकडून एक लाख रुपये उसने घेतले  होते; परंतु ते त्या  पैशाच्या बदल्यात पडाल यांच्याकडे व्याजाने 9 लाख रुपये मागत होते. त्या पैशापोटी 13 मे रोजी कल्याण पडाल यांच्याकडे दोन अनोळखी व्यक्‍ती आल्या होत्या व त्यांनी पडाल यांना बाहेर कुठे तरी नेले होते. त्यानंतर पडाल हे घरी आल्यानंतर प्रचंड तणावात होते, तसेच पडाल यांचा वडिलोपार्जित अमृता ऑर्केडच्या जवळील गाळादेखील खासगी सावकारांनी लिहून घेतला होता व त्यानंतरही ते वारंवार पडाल यांच्याकडे  पैशाची  मागणी करून धमकी देत होते. त्या तणावातूनच कल्याण पडाल यांनी 17 मे रोजी राहत्या   घरी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

घरात घुसून बायको-मुलांना उचलून नेण्याची धमकी!

कल्याण पडाल यांनी याबाबत पोलिस  आयुक्‍तांकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये श्रीनिवास संगा, संतोष बसुदे व इतरांच्या नावाचा उल्लेख आहे तसेच श्रीनिवास संगा व संतोष बसुदे यांनी पैसे दिले नाही तर तुझ्या घरात घुसून बायका-मुलांना उचलून नेण्याची धमकी देऊन वेळ पडल्यास ठार मारतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळेच कल्याण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येस संगा व बसुदेच जबाबदार असल्याची नोंद जेलरोड पोलिस  ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस  उपनिरीक्षक जंगम तपास करीत आहेत.