Tue, Nov 13, 2018 08:22



होमपेज › Solapur › जगद‍्गुरू तुकोबारायांच्या सोहळ्याचे उभे रिंगण उत्साहात

जगद‍्गुरू तुकोबारायांच्या सोहळ्याचे उभे रिंगण उत्साहात

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 8:34PM



माळीनगर  : गोपाळ लावंड 

टाळ-मृदुंगाचा ध्वनी  
गेले आसमंत व्यापुनी !
नभ आले भरूनी  
अश्‍व दौडले रिंगणी !  

पंढरीच्या दिशेने निघालेला पालखी सोहळा गुरूवारी बोरगाव मुक्कामी निघाला असता माळीनगर (ता. माळशिरस) येथे  विसाव्यासाठी थांबला होता. यावेळी संपूर्ण माळीनगर परिसर हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. संतश्रेष्ठ जगद‍्गुरू  तुकाराम महाराजांच्या  पालखीचे उभे रिंगण मोठ्या भक्‍तीमय वातावरणात पार पडले. माळीनगर पालखी मैदानात अश्‍वांनी नेत्रदीपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळ-मृदुंगाचा नाद, त्यातून निर्माण होणारा ज्ञानबा-तुकाराम नामाचा गजर या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय.

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे ! 

टाळ-मृदुंगाचा नाद, कपाळी गोपीचंद, बुक्‍का, अष्टगंध आणि मुखात हरिनामाचा जयघोष करीत गेले पंधरा दिवस अखंडितपणे विठूरायाच्या ओढीने निघालेला वारकरी हजारो वैष्णवांच्या साक्षीने सकाळी माळीनगरनगरीत पोहोचला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मानाच्या अश्‍वाच्या उभ्या रिंगणाने भल्या सकाळी मॉडेल हायस्कूलच्या प्रशस्त प्रांगणात मोठ्या उत्साहाने विसावला. 

याची देही याची डोळा 
पाहावा संत सोहळा ! 

याची प्रचिती देणारा सोहळा पाहून श्रीपूर परिसराला जणू विठ्ठल नामाचे वेड लागले होते. ज्ञानोबा माऊली, तुकाराम गजराने आसमंत दुमदुमला. सकाळपासून पालखी स्वागतासाठी ग्रामपंचायत माळीनगर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी  यांच्यासह अनेक सामाजिक संघटना, महात्मा फुले पतसंस्था,  स्थानिक प्रतिनिधी सज्ज झाले होते.उभ्या रिंगणासाठी जमलेला हजारोंचा जनसमुदाय डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मानाच्या अश्‍वाने रिंगणात धाव घेतल्यानंतर दोहोबाजूला उभा असणारा  वारकरी  भान हरपून गेला होता. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ म्हणत सोहळा डोळ्यात साठवत होता. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यावर सालाबादप्रमाणे शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखा गिरमे यांच्या हस्ते   विधीवत पूजन करण्यात आले. 

याप्रसंगी सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अनिल रासकर, माळीनगरचे  सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच सारिका एकतपुरे, सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. माळी शुगरचे  डायरेक्टर  विलास इनामके,  संचालक मोहन लांडे, परेश बोरावके, विशाल जाधव, गणेश इनामके,  महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे, रिंकू राऊत, रंगनाथ महाराज परभणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्‍वस्त अशोक महाराज मोरे, बाळासाहेब मोरे, सुनील मोरे, अभिजित मोरे, विठ्ठल मोरे, पुजारी सुभाष टंकसाळे, चोपदार अर्जुन गिराम,  बाळासाो शिंदे यांचा सत्कार माळी शुगरच्यावतीने राजेंद्र गिरमे यांनी केला.