Sun, May 19, 2019 14:31
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी!

काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी!

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 9:10PMबारामती : प्रतिनिधी

काटेवाडीच्या अंगणी, 
मेंढ्या धावल्या रिंगणी, 
पायघड्या धोतराच्या, 
झाला गजर हरिनामाचा!

कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मेंढ्यांचे रिंगण शनिवारी (दि. 14) बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे पार पडले. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी काटेवाडीत गर्दी केली होती.

संत तुकाराम महाराज  पालखी सोहळ्याला येथे मेंढ्यांचे रिंगण घातले जाते. पूर्वी हा सोहळा जात असताना मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी एका मेंढपाळाने पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते, तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा जपली गेली आहे. 

शनिवारी दुपारी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या टाकून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तीन वाजता परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांसह पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालत रिंगण पूर्ण केले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी हरिनामाचा एकच गजर केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 

दरम्यान तत्पूर्वी शनिवारी  सकाळी सोहळा बारामतीतून निघाल्यानंतर मोतीबाग, पिंपळी लिमटेक येथे थांबत काटेवाडीकडे गेला. काटेवाडीत पालखी दर्शन मंडपात नेताना परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी खांद्यावरून पालखी नेली. बारामती टेक्सटाईल पार्कच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.