Mon, Jun 17, 2019 03:15होमपेज › Solapur › दरोडा टाकून ट्रक पळविणार्‍या टोळीला अटक

दरोडा टाकून ट्रक पळविणार्‍या टोळीला अटक

Published On: Jan 06 2018 1:28AM | Last Updated: Jan 05 2018 9:40PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर शिवारात दरोडा घालून 265 तुरीच्या पोत्यांसह ट्रक पळविणार्‍या टोळीला जेरबंद करण्यास  सोलापूर  ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे  शाखेला यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून 213 पोती तूर, एअरगन, बोलेरो जीप व मालट्रक असा सुमारे 13 लाख 47 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अशोक बबन निळे (वय 30, रा. व्हसपेठ, ता. जत, जि. सांगली), पैगंबर सिकंदर शेख ( 27, रा. तासगाव फाटा, ता. मिरज, जि. सांगली), संभाजी वसंत ननवरे (24), दत्ता रायगोंडा बंडगर (25, दोघे रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून दादासाहेब पडोळकर (रा. कुलाळवाडी, ता. जत, जि. सांगली) हा पसार झाला आहे. 

नंदकुमार सयाजीराव शिंदे (रा. मळनगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे 18 डिसेंबर 2017 रोजी मालट्रक क्र. एमएच 10 झेड 2304 मध्ये 265 पोती तूर घेऊन जत तालुक्यातील संख येथून सोलापूर येथे जात होते. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील पेट्रोलपंपाच्या अलीकडे मालट्रक आल्यानंतर मागून पांढर्‍या रंगाच्या बोलेरो जीप गाडीतून आलेल्या 4 अनोळखी व्यक्‍तींनी बोलेरो जीप मालट्रकच्या आडवी लावून ट्रक थांबविण्यास भाग पाडले होते. ट्रक थांबल्यानंतर जीपमधील चौघांनी ट्रकच्या केबीनमध्ये चढून नंदकुमार शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मालट्रक, त्यातील 265 पोती तूर, 4300 रुपये रोख व मोबाईल इॅन्डसेट जबरदस्तीने चोरुन नेला होता. म्हणून शिंदे यांच्या फिर्यादीवरून कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास करताना हा गुन्हा सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या  माहितीच्याआधारे पोलिसांनी तपास केला असतो गुन्हेगार हे 3 जानेवारी  रोजी पांढर्‍या रंगाच्या बोलेरो जीपमधून उमदी, हुलजंतीमार्गे मंगळवेढ्याकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी  हुलजंती फाटा येथे  संशयित  बोलेरो जीप अडवून जीपमधील लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी जीपमधील गुन्हेगारांनी ट्रक चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी जीपमधील चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 213 पोती तूर, बोलेरो जीप, मालट्रक, एअरगन असा मुद्देमाल  जप्त  केला. सध्या सर्व गुन्हेगार हे कामती पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, हवालदार नारायण गोलेकर, गोरक्षनाथ गांगुर्डे, दिलीप राऊत, पोलिस शिपाई सागर शिंदे, सचिन मागाडे, व्यंकटेश मोरे, मनिष पवार, ईस्माईल शेख, दीपक जाधव यांनी केली.