Thu, Sep 19, 2019 03:27होमपेज › Solapur › माढा मतदारसंघात 'ट्रिपल एम' फॅक्टर निर्णायक

माढा मतदारसंघात 'ट्रिपल एम' फॅक्टर निर्णायक

Published On: May 23 2019 11:04PM | Last Updated: May 23 2019 11:04PM
पंढरपूर : प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने पहिला वहिला विजय साजरा केला असला तरीही या विजयात माळशिरस तालुका आणि मोहिते पाटील आणि माण विधानसभा हे तीन एम फॅक्टर महत्वाचे  ठरल्याचे दिसते. माळशिरस तालुक्यातील मताधिक्यामुळेच भाजपने विजयाचा गुलाल उधळला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून 1 लाखाचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली होती. त्यानुसार प्रत्यक्ष मतमोजणी वेळी माळशिरसचे मताधिक्य निर्णायक ठरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना माढा, करमाळा आणि सांगोला या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले तर निंबाळकर यांना माळशिरस, फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. 

माढा, सांगोला, करमाळा इथून मिळालेले मताधिक्य माळशिरस,मान मध्ये जिरून जायचे आणि निंबाळकर प्रत्येक फेरीत आघाडी घ्यायचे.  काही फेऱ्यामध्ये माण, फलटण मध्येसुद्धा शिंदे यांनी मताधिक्य घेतले मात्र माळशिरस मतदारसंघात शिंदे यांना प्रत्येक फेरीत पिछाडीला रहावे लागले. एवढेच नाही तर शिंदे यांच्या पेक्षा निंबाळकर यांना दुप्पट मताधिक्य मिळत गेले. त्यामुळे शिंदे यांना शेवटपर्यंत विजयाची शक्यता दिसलीच नाही. माळशिरस पाठोपाठ माण मतदारसंघानेही या निवडणुकीत भाजपला निर्णायक हातभार दिला. तुलनेने निंबाळकर यांना फलटण मतदारसंघात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही तर शिंदे यांना काही फेऱ्यात माढा मध्येही पिछाडीला रहावे लागले. माण मध्ये काही फेऱ्यात शिंदे यांना लीड मिळाले असले तरी ते अतिशय किरकोळ स्वरूपाचे होते. भाजपच्या या ऐतिहासिक विजयात मोहिते पाटील, माळशिरस आणि माण विधानसभा हे तीन एम फॅक्टर निर्णायक ठरले आहेत. यामुळेच राष्ट्रवादीचे संस्थान खालसा करण्यात भाजपला यश आले आहे.