Tue, Apr 23, 2019 13:57होमपेज › Solapur › अभ्यासाविनाच ‘परिवहन’ समितीने बजेट उरकले

अभ्यासाविनाच ‘परिवहन’ समितीने बजेट उरकले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

महापालिका परिवहन समितीने प्रशासनाने सादर केलेल्या बजेटबाबत मंगळवारी अभ्यास न करताच त्याला मंजुरी देण्याचा ‘पराक्रम’ केला. परिवहनचे उत्पन्न, कर्मचार्‍यांचे पगार याबाबत गंभीर विचार न करता स्वत:चे भत्ते, मानधन आदींमध्ये वाढ करण्यात समितीने धन्यता मानली.  80 कोटी 42 लाख 51 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला समितीने एकमताने मान्यता दिली.

सभापती तुकाराम मस्के यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा झाली. प्रशासनाने सादर केलेल्या बजेटचा सखोल अभ्यास न करताच समितीने बजेट उरकण्याची घाई केल्याचे सभेनंतर स्पष्ट झाले. प्रशासनाने 79 कोटी 11 लाख 21 हजार रुपयांचे बजेट समितीकडे सादर केले होते. त्यात समितीने 1 कोटी 31 लाखांची वाढ सूचविली. आर्थिक अरिष्टात असलेल्या परिवहन उपक्रमाला उर्जितावस्थेत आणण्याचे कोणतेही व्हीजन समितीला नसल्याचे बजेटवरुन दिसून आले. कर्मचार्‍यांचा पगार यासह अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचारच समितीने केला नाही. स्वागत समारंभ, ऐच्छिक खर्च, पेट्रोल खर्च, सदस्य वाहन व मिटींग भत्ता, सभापती व सदस्यांचा प्रवास खर्च यामध्ये समितीने मोठी वाढ सुचवून आपली ‘चांदी’ करुन घेण्याचा प्रयत्न केल्याचे बजेटच्या आकडेवारीवरुन दिसून आले. 

‘त्या’ विषयांवरुन संभ्रमावस्था

प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये अनेक सूचना व शिफारशी होत्या. यामध्ये परिवहन उपक्रम एस.टी. महामंडळाकडे वर्ग करणे, खासगीकरण करणे, मनपाकडून भरीव अनुदान घेणे असे तीन पर्याय प्रशासनाचे सूचविले होते. प्रशासनाने सूचविलेले सर्वच सूचना-शिफारशी मंजूर केल्याचे सभापती मस्के यांनी पत्रकारांना सांगितले. यावर पत्रकारांनी खासगीकरणाला तुमची मान्यता आहे का? असा सवाल केला असता सभापतींसह उपस्थित सदस्य गोंधळून गेले. प्रशासनाचा बजेट पूर्णपणे वाचला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे अभ्यास न करताच समितीने बजेटला मंजुरी देण्याची घाई केल्याचे स्पष्ट झाले. 

शासनाकडून परिवहनला आकारण्यात येणारे विविध शासकीय कर व पथकर माफ होण्याकामी पाठपुरावा करणे, पोलिस अनुदानाबाबत पाठपुरावा करणे, बसेस दुरुस्ती-देखभालकरीता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी निधी उपलब्ध करणे, ग्रामीण भागात ज्या मार्गांवर तोटा आहे ते मार्ग कमी करणे, रुट मॅपिंग तयार करुन उत्पन्नवाढीसाठी वाहतूक विभागाने योग्य ते मूल्यमापन करावे, सुटे भाग खरेदीवर नियंत्रण ठेवणे आदी शिफारशी समितीने केल्या आहेत. 

Tags : 


  •