Sun, Nov 18, 2018 09:21होमपेज › Solapur › माल वाहतूक ठप्प

माल वाहतूक ठप्प

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी 

इंधन दरवाढ विरोधासह टोलमुक्‍ती, जीएसटी सवलत अशा विविध सहा मागण्यांसाठी मालमोटार वाहतूक संघटनांचा 20 जुलैपासून बेमुदत संप चालू आहे. त्यामुळे आवक घटल्याने जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याचे संकट जिल्ह्यात उभे ठाकले आहे. हा संप मिटला नाही, तर पेट्रोल व डिझेल या इंधनटंचाईचे संकटही उभे ठाकणार आहे. तूर्त रेशनच्या धान्याचा कडेकोट पोलिस बंदोबस्तात खासगी वाहनांद्वारे पुरवठा केला जात आहे. जिल्हा मोटार मालक असोसिएशनसह सोलापूर गूडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांनी याबाबत माहिती देताना हा संप  बेमुदत असून यात सरकारने वेळीच लक्ष घालून तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली आहे.

नवी दिल्लीच्या ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टने हा संप जाहीर केला आहे. या देशव्यापी संपाच्या अनुषंगाने  सोलापुरात जिल्हा मोटार मालक संघ,  सोलापूर गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशन, सोलापूर टेम्पो मालक संघ, सोलापूर जिल्हा रेल्वे गुडस् हुंडेकरी असोसिएशन यांची संयुक्‍त बैठक पार पडली. यात हा बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस संघटनाचे संचालक, सभासद, हुंडेकरी असोसिएशन, ट्रक मालक संघटनेने संपास एकमताने पाठिंबा जाहीर  केला आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व वाहतुकीची वाहने व कार्यालये बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले. संपात सहभागी रेल्वे हुंडेकरी असोसिएशनच्या संपामुळे अडीचशे ट्रक, तर ट्रान्सपोर्ट माल वाहतूक असोसिएशनच्या संपामुळे जवळपास अडीच हजार ट्रकचा चक्‍काजाम आंदोलन सुरु आहे. ज्या-त्या ठिकाणावर माल पडून राहात असून मालाची वाहतूक होणार नसल्याचे सांगण्यात आले. 

सध्या सोलापूर रेल्वे स्टेशनच्या जंबो गुडशेडमध्ये एक लाख सिमेंटची पोती संपामुळे जागीच पडून आहेत.  54 हजार गव्हाची पोती जीवनावश्यक वस्तू म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार पोलिस बंदोबस्तात टिकेकरवाडी येथील एफसीआय गोडावूनला पाठवण्यात आल्याचे हुंडेकरी असोसिएशनची सचिव बाबुराव घुगे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप डिलर असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख यांनी या संपामुळे इंधनावरही निश्‍चितच परिणाम होणार असल्याचे सांगितले. तरी बराचसा पुरवठा हा रेल्वेने होत असल्याने झळ कमी बसत आहे. मात्र शहरात 19, तर जिल्ह्यात जवळपास 197 पेट्रोल पंप आहेत. इंधनाचा पुरवठा होण्यासाठी माल वाहतूकदारांच्या संपाचा विषय मिटला पाहिजे. भविष्यात लवकर संप  मिटला नाही तर इंधनाचाही तुटवडा होणार असल्याची भीती ताटे-देशमुख यांनी व्यक्‍त केली.