Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Solapur › प्रस्ताव नसताना केल्या बदल्या

प्रस्ताव नसताना केल्या बदल्या

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:32PMसोलापूर : रणजित वाघमारे

वर्ग 3 मधील कर्मचार्‍यांचे बदल्यांचे प्रस्ताव उपसंचालक तथा नियुक्‍ती अधिकार्‍यांनी संचालकांकडे पाठवले नाहीत. असे असताना संचालक आणि उपसचिव यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग 3 मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचा घोळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

वर्ग 3 मधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे प्रस्ताव नियुक्‍ती अधिकारी  तथा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी संचालक डॉ. सतीश पवार यांच्याकडे पाठवणे गरजेचे आहे. मात्र सध्या बदल्यांचा कालावधी नसल्याने ते प्रस्ताव त्यांनी पाठवले नसल्याचे दै. ‘पुढारी’ला सांगितले.

मात्र नियुक्‍ती अधिकारी तथा उपसंचालक डॉ. देशमुख यांनी संचालक डॉ. सतीश पवार यांच्याकडे बदलीचे प्रस्ताव पाठवले नसताना तसेच बदल्यांचा कालावधी नसताना सोलापूर व पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ लिपिकांच्या आपापसांत विनंती बदल्या केल्या आहेत. ज्यामध्ये संचालक डॉ. सतीश पवार यांच्याबरोबर उपसचिव डॉ. संजय मोरे यांचाही समावेश आहे. त्यापलीकडे जाऊन  संचालक डॉ. पवार व उपसचिव डॉ. मोरे यांनी यातील काही कर्मचार्‍यांचे विनंती अर्ज नसताना त्यांची आपापसांत विनंती बदली केल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. 

या बदल्यांमध्ये डॉ. बंदोरवाल हॉस्पिटल, पुणे येथील वरिष्ठ लिपीक  बी. आर. मेरगू, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, सोलापूर येथील वाय. आय. शेख, उपजिल्हा रूग्णालय, अकलूज येथील वरिष्ठ लिपीक मनिषा नागेश बंदपट्टे आणि जिल्हा क्षयरोग कार्यालयातील वरिष्ठ लिपीक माणिक नागनाथ कदम यांचा समावेश आहे. त्यांच्या 15 नोव्हेंबर 2017 रोजी आपापसांत विनंती बदल्या केल्याचे आदेश उपसचिव संजय मोरे यांनी काढले आहेत. 

मात्र, या चुकीच्या व अन्यायकारक बदल्यांविरोधात यातील अन्यायग्रस्त वरिष्ठ लिपीक वाय. आय. शेख आणि माणिक नागनाथ कदम यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर औद्योगिक न्यायालयाने या बदलीस सध्या स्थगिती दिली असल्याचे सांगण्यात आले.