Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Solapur › अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

Published On: Dec 08 2017 1:44AM | Last Updated: Dec 07 2017 8:01PM

बुकमार्क करा

पंढरपूर: प्रतिनिधी

दोन्ही बाजूंनी व्यापार्‍यांनी केलेली अतिक्रमणे, कशाही प्रकारे लावलेली टमटम आणि छोटी वाहने, त्यातच भर म्हणजे 6 ते 10 चाकी अवजड वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो रस्त्याच्या मधोमध उभा राहून रिकामे होत असतात. त्यामुळे पंढरपूर बसस्थानक ते नगरपालिका हा महत्त्वाचा रस्ता कायमच वाहतुकीच्या कोडींमध्ये हरवलेला असतो. या रस्त्याकडे नगरपालिकेइतकेच वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष करून या मार्गाने ये-जा करणेही आता जोखमीचे झालेले आहे.

पंढरपूर नगरपालिकेकडून नवीन बसस्थानकाकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक आणि स्टेशन रोडला समांतर हा रस्ता असल्यामुळे तसेच या रस्त्याना जोडणारे रस्ते याच प्रमुख रस्त्याचा 5 ठिकाणी छेदून जात आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता त्यामुळे नगरपालिका ते बसस्थानक या रस्त्यावर सर्वच बाजूने कायम स्वरूपी वाहतूक सुरू असते. बसस्थानकावरून येणारे भाविक, सोलापूर मार्गे अर्बन बँक चौकातून येणारी वाहने याच मार्गे छत्रपती शिवाजी चौकाकडे आणि विठ्ठल मंदिराकडे जातात. त्यामुळे नगरपालिका ते नवीन बसस्थानक हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. 

मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी  दुकानदार, व्यापारी आणि खोकीधारकांचे किमान 10-10 फूट अतिक्रमण आहे. उर्वरित रस्त्यावर नगरपालिकेपासून ते सचिन प्रींटिग प्रेसपर्यंत जागो-जागी दोन्ही बाजूंनी ट्रक, टेम्पो, टमटम उभा केलेल्या असतात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी पुन्हा 10 ते 12 फुट रस्ता कमी होतो. या परिस्थीतीमध्ये उरलेल्या 10 ते 12 फूट रस्त्यावरून सर्वच बाजूंनी होणारी रहदारी सुरू असतो. मंगळवारी आठवडी बाजारच्या दिवशी तर या रस्त्यावरच दुकानदार बसलेले असतात. त्यावेळी रिक्षा, कार, टमटम, छकडे, हातगाडी एवढच नाही तर मोटार सायकलसुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे जेमतेम 500 मीटर्सवरील बसस्थानकाकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर जागोजागी वाहतूक, पार्कींगचे फलक लावले आहेत. मात्र तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष केेलेले असते. यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने शहरातील जड वाहतुकीला निर्बंध घातले असले तरीही बसस्थानक ते नगरपालिका या रस्त्यावर दिवस-रात्र अवजड वाहने येत असतात आणि तासन्तास रस्ता अडवून माल खाली करेपर्यंत उभा असतात. मध्यंतरी नगरपालिका तसेच वाहतूक शाखेने व्यापार्‍यांना केवळ रात्रीच्या वेळेसच वाहने शहरात आणण्याच्या सूचना केल्या होत्या.त्या सूचना केराच्या टोपलीत टाकून या मार्गावरील व्यापारी आपले भले मोठे ट्रक आणून रस्त्यावर उभा करतात आणि माल उतरवून घेत असतात. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर जागो-जागी वाहतुकीची कोंडी होत असते. व्यापार्‍यांना  माल आणण्याकरिता छोटी वाहने वापरल्यास आणि रस्त्याच्या कडेला उभा होणारी टमटम, टेम्पो, ट्रकसारखी वाहने जवळच्या मोकळ्या जागेत उभा केल्यास हा रस्ता पुरेशा प्रमाणात मोकळा होईल आणि रहदारी सुरळीत चालेल. परंतु, ना वाहतूक शाखा यासाठी काही करते ना नगरपालिका कोणती पावले उचलते. त्यामुळे हा रस्ता पंढरपूर शहरातील अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक, अवडज वाहनांच्या गर्दीत हरवून गेला आहे.