Tue, Apr 23, 2019 23:37होमपेज › Solapur › माचणूरचे सिद्धेश्‍वर मंदिर श्रावणातील पर्यटन 

माचणूरचे सिद्धेश्‍वर मंदिर श्रावणातील पर्यटन 

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:17PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

मंगळवेढा तालुक्यातील  मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील  क्षेत्र माचणूर हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून तिथे असणारे प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिर हे श्रावण महिन्यात भाविकांनी फुललेले असते. या नयनरम्य परिसरात आध्यत्मिक अनुभूति घेण्याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी भविकांची गर्दी असते. या महिन्यात दर सोमवारी धार्मिक कार्यक्रमासाठी व शंभु महादेवाच्या दर्शनासाठी भविकांचा ओघ वाढलेला असतो. 

सध्या श्रावण महिन्यामुळे अनेक भाविक भक्‍त माचणूर येथील सिद्धेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी येत आहे. या महिन्यात माचणूर गावातील लोकात आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक जण आपल्या पाहुण्यांना व नातेवाईकांना दर्शनासाठी बोलवत असतो. त्यामुळे गावातील वातावरण उत्साहित असते. श्रावण महिन्यात दर दिवशी माचणूर येथे धर्मिक कार्यक्रम अभिषेक महाप्रसाद सुरू असतात.  

मंगळवेढ्यापासून 14 किमी  तर सोलापूर पासून 43 किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वाहत जाणार्‍या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचीन सिध्देश्‍वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. माचणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्‍वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकर्‍यासाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्‍या उतरून दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्‍या काढलेल्या आहेत. मंदिरात  3 फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी दोन दारे आहेत. त्यातील पहिले दार 5 फूट उंचीचे तर दुसरे दार 2.5 फूट उंचीचे आहे. या खिडकी वजा दरवाजातून बसूनच गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागील बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे. हा घाट आहिल्या देवी होळकर  यानी बांधला आहे. खाली नदी पात्रात जटा शंकराचे मंदिर आहे. सध्या नदिला पाणी भरपूर असल्याने हे मंदिर पाण्याखाली आले आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे. दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भीमा नदीच्या काठी इ.स. 1695 च्या आसपास किल्ला बांधला. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.

  गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केला की पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. माचणूर धार्मिक स्थळ आहे तसे ते ऐतिहासिक स्थळ आहे. येथे महाशिवरात्रीची यात्रा मोठी असते. कर्नाटक मधून हजारो भाविक भक्‍त दर्शनासाठी येथे येत असतात.