Thu, Jul 18, 2019 04:17होमपेज › Solapur › सोलापूर बाजार समितीसाठी आज मतदान

सोलापूर बाजार समितीसाठी आज मतदान

Published On: Jul 01 2018 12:11AM | Last Updated: Jul 01 2018 12:07AMसोलापूर/बार्शी ः प्रतिनिधी 

सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन तथा निवडणूक कार्यालयाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. रविवारी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील 250 मतदान केंद्रांवर यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. सोलापूर बाजार समितीसाठी जवळपास 1 लाख 18 हजार 899 शेतकरी मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. 

त्याद‍ृष्टीने निवडणूक कार्यालयाच्या मतदान केंद्रांवर 1250 कर्मचारी तैनात केले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडणार आहे. बार्शी बाजार समितीसाठी 167 मतदान केंद्रांवर 1 लाख 6 हजार 209 मतदार मतदान करतील. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवारी (3 जुलै) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

शेतकर्‍यांनी निवडून द्यायच्या 15 गणांतून 1 लाख 16 हजार 625 शेतकरी मतदान करणार आहेत. त्याद‍ृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक गावात मतदान केंद्र ठेवण्यात आले असून ज्याठिकाणी 600 पेक्षा अधिक मतदार आहेत. त्याठिकाणी दोन मतदान केंद्रे ठेवण्यात आले आहेत. मतदान केंद्रासाठी  एक निवडणूक निरीक्षक, एक निवडणूक निर्णय अधिकारी, तीन सहाय्यक निवडणूक अधिकारी, 18 झोनल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला केंद्राध्यक्ष आणि दोन सहाय्यक मतदान अध्यक्ष आणि शिपाई अशी नेमणूक करण्यात आली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने जवळपास 250 पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. मतदानपत्रिका व कर्मचार्‍यांसाठी 34 एसटी बसेस, 17 जीप देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्याने मतपत्रिका पावसात भिजू नये तसेच मतपेट्या सुरक्षित राहाव्यात यादृष्टीने सर्व साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या आहेत. यासाठी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदान सुरु झाल्यापासून संपेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी कशा पध्दतीने करायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली आहे. मतमोजणी सोरेगाव येथे ठेवण्यात आली असून त्याठिकाणी एक गणासाठी दोन टेबलांवर मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली आहे.

बार्शी बाजार समितीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समितीच्या तीनही पॅनलनी प्रचाराचा धडाका उडवून दिला होता. या बाजार समितीच्या 18 जागांसाठी 59 उमेदवार निवडणूक  रिंगणात आहेत. ही निवडणूकदेखील अत्यंत चुरशीची होणार आहे.

दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रतिस्पर्धी पॅनेल उभे केली आहेत. पालकमंत्री तर स्वत: उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, ही निवडणूक दोघांसाठी पुढील राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

 18 संचालकांच्या निवडीसाठी...

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या 18 संचालकांच्या निवडीसाठी 61 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत. रविवारी या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. कळमण गणात 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नान्‍नज गणात 3, पाकणी गणात 2, मार्डी गणात 3, बोरामणी गणात  8, बाळे गणात 3, हिरज गणात 2, कुंभारी गणात 7, मुस्ती गणात 3, होटगी गणात 5, कणबस गणात 7, मंद्रुप गणात 5, कंदलगाव गणात 4, भंडारकवठे गणात 4, औराद गणात 6 उमेदवार रिंगणात असून व्यापारी मतदारसंघात 5 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हमाल-तोलार मतदारसंघातून 11 जण निवडणूक रिंगणात आहेत.