होमपेज › Solapur › अक्कलकोटमध्ये आज संकल्पसिद्धीचा सोहळा

अक्कलकोटमध्ये आज संकल्पसिद्धीचा सोहळा

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 26 2018 11:16PMसोलापूर :  प्रतिनिधी

श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य श्री तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या संकल्पसिद्धी कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी सकाळी रंभापुरी, उज्जैन, श्रीशैल व काशी या चारही प्रमुख जगद‍्गुरुंच्या दिव्य सान्निध्यात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संकल्पसिद्धीचा मुख्य सोहळा होत असल्याची माहिती पालकमंत्री तथा संकल्पसिध्दी कार्यमहोत्सवाचे स्वागताध्यक्ष विजयकुमार देशमुख, कार्याध्यक्ष आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली. 

अक्‍कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिर प्रांगणात तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांनी संकल्प केल्याप्रमाणे 108 फूट उंच श्रीशैल पीठाचे आद्य जगद‍्गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या लिंगोदभव मूर्तीचा लोकार्पण सोहळा, 1008 शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना तसेच 14 फूट उंच नंदीश्‍वर मूर्तीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी अक्‍कलकोट रोडवरील वीरतपस्वी मंदिराच्या प्रांगणात होत आहे. 

हा सोहळा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व होटगी मठाचे मठाधिकारी डॉ. मल्‍लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली  आयोजित करण्यात आला असून यावेळी  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा. शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आ. दिलीप माने, बसवराज पाटील, आ. मधुकर चव्हाण, आ. प्रणिती शिंदे, आ. प्रशांत परिचारक, विश्‍वनाथ चाकोते, शिवशरण पाटील आदी उपस्थित राहात आहेत. 

यावेळी 50 मठांचे मठाधिपती शिवाचार्यगण उपस्थित राहणार आहेत. सकाळी सहा ते अकरापर्यंत 1008 शिवलिंगाचे शिवाचार्यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी 300 बाय 100 फुटी भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. व्यासपीठाच्या खाली समोरील बाजूस सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांसाठी व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. यावेळी डाव्या बाजूला मान्यवर व पत्रकार, तर उजव्या बाजूस पुरुष भक्‍तांसाठी आसनांची सोय करण्यात आली आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक लाख सद्भक्‍त सहभागी होण्याचा अंदाज व्यक्‍त होत असून या सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. 

17 एप्रिल रोजी संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला होता. 1008 गोमाता पूजन, 1008 दाम्पत्यांच्या हस्ते होमहवन पूजा, सिद्धांत शिखामणी पारायण, श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावर प्रवचन, अय्याचार व दीक्षा आदी कार्यक्रम महास्वामींच्या संकल्पसिद्धीनुसार यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी लक्ष दीपोत्सवाने या संकल्पसिद्धी कार्यक्रमाचा समारोप करण्यात येत आहे. 

Tags : Celebration, Ceremony In Akkalkot