Sat, Apr 20, 2019 08:02होमपेज › Solapur › तालुका स्तरावर कृषी महोत्सव भरवण्याचा मानस : जिल्हाधिकारी

तालुका स्तरावर कृषी महोत्सव भरवण्याचा मानस : जिल्हाधिकारी

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी, उत्पादित मालाला बाजारपेठ व योग्य भाव मिळण्यासाठी कृषी महोत्सवांची भूमिका महत्त्वाची आहे. तालुका स्तरावर कृषी महोत्सव आयोजित केल्यास त्याचा शेतकर्‍यांना लाभ होईल. यासाठी येत्या काळात कृषी विभागामार्फत तालुका स्तरावर असे महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  केले.

कृषी विभागामार्फत होम मैदान येथे 11 ते 15 मार्च 2018 याकालावधीत आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाचा समारोप जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प  संचालक विजयकुमार बरबडे, प्रकल्प व्यवस्थापक रविंद्र माने, सोलापूर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक हणमंतराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कृषी महोत्सव शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमातून शेतकर्‍यांना प्रगत तंत्रज्ञानाची माहिती अवगत होते. पीक पद्धती, हवामान, माती परिक्षण, खतांचा वापर यांची माहिती महोत्सवात आयोजित केलेल्या विविध सत्रांतून शेतकर्‍यांना सहजतेने मिळते. 

यामुळे असे महोत्सव तालुका स्तरावर झाल्यास ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना त्याचा निश्‍चितच लाभ होईल. कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकर्‍यांना एका छताखाली मिळेल. सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवास अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. 

महोत्सवात लावण्यात आलेल्या 250 स्टॉलवर सुमारे 35 लाखांची उलाढाल झाली. पाच दिवसांत तब्बल एक लाख शेतकरी तसेच सामान्य नागरिकांनी महोत्सवास भेट दिल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले, तर आभार कल्पक चाटी यांनी मानले.