Mon, Apr 22, 2019 16:14होमपेज › Solapur › कायमस्वरूपी उद्घोषणा यंत्रणा बसविणार

कायमस्वरूपी उद्घोषणा यंत्रणा बसविणार

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:56AMतुळजापूर : प्रतिनिधी

श्री तुळजा भवानीमातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 10 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. याच्या पूर्वतयारीसाठी विविध विभागांची बैठक मंगळवारी झाली. ही बैठक प्रशासकीय स्तरावरची असल्याने विविध प्रशासकीय विभागप्रमुखांची ही बैठक घेण्यात आली. त्यामुळे संस्थानचे विश्‍वस्त सदस्य स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी या बैठकीस निमंत्रित नव्हते. या बैठकीत भक्तांच्या सोयीसाठी शहरात कायमस्वरूपी उद्घोषण यंत्रणा बसवण्याचा निर्णय झाला.

नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या व्यापक बैठकीसाठी  विश्‍वस्तांसह तीनही पुजारी मंडळे, पत्रकार यांना पाचारण करणार असल्याचा खुलासा तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील यांनी केला तसेच या प्रशासकीय बैठका येथून पुढे दर आठवड्यास होणार असल्याची माहिती दिली. मंगळवार, 21 रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली महाद्वाराजवळील भक्तनिवास  येथे प्रशासकीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले, मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) राहुल पाटील, सहायक पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पालिकेचे मुख्याधिकारी शिरीष लोकरे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण व महावितरणचे कार्यकारी अभियंता, पालिकेचे अभियंता अमर राऊत, मंदिर संस्थानचे अभियंता राजू भोसले, चव्हाण आदींची उपस्थिती होती. यात शासनाच्या 3 कोटी 75 लाख रुपये यात्रा अनुदानातून होणार्‍या विकासकामांवर चर्चा करण्यात आली. बॅरिकेटिंगचे टेंडर एकाच ठेकेदाराला देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील सीसीटीव्हींची दुरुस्ती, रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना दिल्या गेल्या. नवरात्र यात्रा कालावधीत पथदिवे, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित न करण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या. भाविकांसाठी शहरात कायमस्वरूपी उद्घोषण यंत्रणा बसवण्याचा निर्णय झाला. यात घाटशीळ रोड, दीपक चौक, भवानी रोड, बसस्थानक परिसर याठिकाणी उद्घोषण यंत्रणा बसविण्यात येणार असून याबाबत पोलिस प्रशासनाला प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवरात्र महोत्सवापूर्वी उघड्या विद्युत डीपी बंदिस्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.