Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › वेळेवर पुरवठ्याची बोंब; रेशनचा कोटा घटला!

वेळेवर पुरवठ्याची बोंब; रेशनचा कोटा घटला!

Published On: Jul 12 2018 10:35PM | Last Updated: Jul 12 2018 9:43PMसोलापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्यात रेशनदुकानदारांना माल पुरवठा करण्यासाठी सातत्याने उशीर होत असल्याने अनेक गावांत वेळेवर रेशनचा माल न आल्याने आणि त्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने आता त्या त्या गावातील मालाचा कोटा कमी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. मात्र याला जबाबदार असणार्‍या पुरवठा ठेकेदाराला सातत्याने नोटिसा देऊनही फरक पडत नाही. त्याचा फटका मात्र आता सर्वसामान्य लोकांना बसत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

राज्य शासनाने रास्त भाव दुकानदारांकडून नागरिकांना दर महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडे वाहतूक ठेकेदार नेमण्यात आला आहे. गोडावूनपासून रेशनदुकानापर्यंत माल पुरवठा करण्याची जबाबदारी त्या वाहतूक पुरवठादाराची असते. मात्र त्याच्याकडे आवश्यक वाहने नसल्याने वेळेत रेशनदुकानावर माल पोहोचत नाही. 
त्यामुळे त्याचे वाटप वेळेत होत नसल्याने त्या त्या रेशनदुकानाला देण्यात आलेला कोटा कमी करण्याची वेळ आली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य लोकांना कमीदराने मिळणारे रेशन बंद होणार असल्याने पुरवठा ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे. 

याविषयी   प्रशासनाला  विचारणा केली असता आतापर्यंत अनेकवेळा पुरवठा ठेकेदाराला नोटिसा देण्यात आल्या असल्याची माहितीही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 
त्यामुळे प्रशासन आता कोटा कमी करुन सर्वसामान्य लोकांचे नुकसान करणार की  पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.