Wed, Nov 21, 2018 17:23होमपेज › Solapur › रिव्हॉल्व्हर रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न : सात जणांवर गुन्हा दाखल

रिव्हॉल्व्हर रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न : सात जणांवर गुन्हा दाखल

Published On: May 26 2018 10:38PM | Last Updated: May 26 2018 9:06PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

पोलिसांना दारू धंद्याची माहिती का दिली, म्हणून तसेच पूर्वीचा राग मनात धरून रिव्हॉल्व्हर रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातजणांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशपाल चंद्रकांत लोंढे, आशिष चंद्रकांत लोंढे, अजित ओहोळ, संदीप ओहोळ, रोहन लोंढे, सोन्या भोसले, भूषण वाघमारे (सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात मिलिंद ऊर्फ भैया पालखे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मिलिंद ऊर्फ भैया पालखे हे शुक्रवारी 12 वाजण्याच्या सुमारास आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले असता जुन्या वेशीजवळ पाठीमागून आलेल्या यशपाल चंद्रकांत लोंढे याने दोन्ही हातात रिव्हॉल्व्हर धरून डोक्याला लावले.

रिव्हाल्व्हरचे बटन दाबले असता त्यातून आवाजही आला, मात्र गोळी  उडाली नाही. त्याचवेळी प्रसंगावधान दाखवून त्यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. पालखे हे तेथून पळून जात असताना पाठीमागून यशपाल चंद्रकांत लोंढे, आशिष चंद्रकांत लोंढे, अजित ओहोळ, संदीप ओहोळ, रोहन लोंढे, सोन्या भोसले, भूषण वाघमारे (सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांनी रिव्हॉल्व्हर, तलवार, खंजीर, फावड्याचा लाकडी दांडा, कोयता या शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पालखे यांच्या फिर्यादीवरून वरील सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम करीत आहेत.