Mon, Apr 22, 2019 06:25होमपेज › Solapur › नवी पेठेत दगडफेकीमुळे वातावरण तंग

नवी पेठेत दगडफेकीमुळे वातावरण तंग

Published On: Jul 31 2018 1:38AM | Last Updated: Jul 30 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी

आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून सोलापूर बंददरम्यान नवी पेठमध्ये दगडफेक झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी फौजफाटा मागवला.

नवी पेठलगत शिवाजी चौक, एसटी स्टँड आणि मुरारजी पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव होता. यावेळी आरक्षणासंदर्भात जमावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. यादरम्यान नवी पेठमध्ये जमावातील काहीजणांनी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीजार्च केला आणि जमाव पांगवला. 

पुढील हानी टाळण्यासाठी येथील पोलिसांनी आणखी पोलिस बंदोबस्त मागवला. त्यामुळे नवी पेठमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथे ये-जा करणार्‍या नागरिकांना दुसरीकडून जाण्यास पोलिसांनी सांगितले तसेच येथे जमाव होऊ नये यासाठी संपूर्ण नवी पेठ बाजारपेठेत गस्त घातली.

बँका सुरु 
 सोलापुरात कडकडीत बंद असताना बँकिंग व्यवहार व अत्यावश्यक सेवा सुरुळीत चालू होते. शहरातील मुख्य बाजारपेठांतील बँकानी अर्धे शटर चालू ठेवून दिवसभर कामकाज सुरु ठेवले होते. शहरातील काही एटीएममधील कॅश संपल्याने तुरळकच एटीएम केंद्रे बंद होती. शहरातील औषध दुकाने(मेडिकल) व दवाखाने सुरु होते.आंदोलकांनी अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळल्याने जनतेची अधिक कोंडी झाली नाही.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज यांच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील मुख्य भागातील दुकाने, बाजारपेठा बंद होत्या, परंतु बँकिंग व्यवहार सुरळीत होते.

सोलापूर शहरातील बँका सकाळपासून आपल्या रोजच्या कामात  व्यस्त  होत्या. बँकांतील सर्व कर्मचारी रोजच्याप्रमाणे काम करत  बँकांमध्ये ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात होते. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक,  सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय यासह शासकीय, निमशासकीय, खासगी आदी बँका सुरू होत्या. बँकिंग व्यवहारावर बंदचा परिणाम झाला  नाही. सात रस्ता, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, होटगी रोड, अशोक चौक, बाळी वेस, टिळक चौक आदी भागांतील शासकीय व खासगी बँका चालू होत्या.

शहर पोलिसांचा सोलापुरात कडक बंदोबस्त होता. शहरातील अत्यावश्यक सेवादेखील सुरु होत्या.शहरामधील सर्व दवाखाने व औषधांची दुकाने (मेडिकल) चालू होते.संवेदनशील भागातील मेडिकल दुकाने मात्र दुकानदारांनी स्वत: खबरदारी व सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले होते. पोलिसांचा तगडा  बंदोबस्त असल्याने अत्यावश्यक सेवा असलेल्या औषध दुकानदारांना  बंद ठेवण्याची वेळ आली नाही.