होमपेज › Solapur › चेक न वटल्याने तीन महिने सश्रम कारावास

चेक न वटल्याने तीन महिने सश्रम कारावास

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 7:57PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

समता ग्रामीण बिगरशेती या पतसंस्थेला कर्जापोटी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी यल्लापा आण्णाप्पा बंदपट्टे (रा.शनिवार पेठ, मंगळवेढा) यास येथील न्यायाधीश एम.बी.आसिजा यांनी तीन महिने सश्रम कारावास व पतसंस्थेस 3 लाख 80 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.  नुकसान भरपाईची रक्‍कम 6 महिन्यांच्या आत पतसंस्थेस न दिल्यास 3 महिने जादा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  

याबाबत घटनेची अधिक माहिती अशी की, यल्लाप्पा बंदपट्टे यांनी समता ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेकडून 31 मार्च 2015 रोजी 3 लाख  रुपये कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकीत राहिल्यानंतर संस्थेचे कर्मचारी त्यांच्याकडे वसुलीसाठी गेले असता त्यांनी दि.15 मे 2017 रोजी रतनचंद सहकारी बँकेचा चेक कर्ज खात्यावर भरला. सदरचा चेक भरला असता खात्यावर पुरेशी रक्‍कम शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला. त्यानंतर पतसंस्थेने वकिलामार्फत नोटीस पाठवून रकमेची मागणी करून देखील त्यांनी कर्ज न भरल्याने त्यांचेविरूध्द मंगळवेढा येथील फौजदारी न्यायालयात खटला दाखल केला होता. 

या खटल्यात पतसंस्थेचे वसुली अधिकारी धनंजय माळी यांनी दाखल केलेले पुरावे व साक्षी ग्राह्य मानून न्यायाधीश एम.बी. असिजा यांनी यल्लाप्पा आण्णाप्पा बंदपट्टे यास तीन महिने सश्रम कारावास व संस्थेस 3 लाख 80 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. 

सदर नुकसान भरपाईची रक्‍कम ही निकाल लागलेल्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत नाही दिल्यास ज्यादा 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पतसंस्थेच्यावतीने अ‍ॅड. व्ही.आर. माळी तर आरोपीच्यावतीने  अ‍ॅड.ए.जी.देसाई यांनी काम पाहिले.