Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Solapur › बंधारा फोडणार्‍या तीन शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल

बंधारा फोडणार्‍या तीन शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:19PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उद्देश समोर ठेवून दोन वर्षांपूर्वी साडेसहा लाख रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या वतीने मळेगाव (ता. बार्शी) शिवारातील ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला होता. या बंधार्‍याची मुख्य भिंत पाडून नुकसान केल्याने मळेगाव (ता. बार्शी) येथील तीन शेतकर्‍यांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र मारुती सोनवणे (वय 51, रा. गोविंद प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषी अविनाश इंगोले, जरिचंद विठोबा इंगोले, जहांगीर कोतवाल (सर्व रा. मळेगाव, ता. बार्शी) अशी बंधार्‍याची भिंत फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोनवणे हे बार्शी येथे उपविभागीय जलसंधारण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 

ग्रामीण भागात बंधारे, तलाव निर्माण करून ‘पाणी अडवा, पाणी  जिरवा’ यासाठी कामकाज केले जाते. 2015-16 मध्ये जामगाव येथील शेतकरी जहांगीर कोतवाल व ऋषी अविनाश इंगोले यांचे शेती गट नं 461 मधील ओढ्यावर सिमेंटचा बंधारा क्र. 4 असा बांधून तयार केला होता. 

त्या बंधार्‍यामुळे परिसरातील  विहिरीत पाण्याची पातळी वाढत होती. 8 जून रोजी सोनवणे यांनी पाहणी केली होती तेव्हा हा बंधारा व्यवस्थित होता. त्यानंतर 10 जून रोजी सायं.  6 वा.च्या सुमारास ते मळेगाव येथील सिमेंट बंधार्‍याची पाहणी केली असता बंधार्‍याची मुख्य भिंत पाडलेली दिसून आली. चौकशीनंतर बंधार्‍याची भिंत ही ऋषी अविनाश इंगोले, जरीचंद विठोबा इंगोले, जहांगीर कोतवाल यांनी पाडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.