Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Solapur › ४० मोरांच्या हत्यांप्रकरणी तिघांना अटक

४० मोरांच्या हत्यांप्रकरणी तिघांना अटक

Published On: Aug 22 2018 12:10AM | Last Updated: Aug 22 2018 12:05AM बार्शी : तालुका प्रतिनिधी 

मालेगाव येथील घोडके वस्ती व परिसरात विषप्रयोगामधून तब्बल 40 मोर, लांडोरांसह वेगवेगळ्या पक्ष्यांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी  मंगळवारी मालेगाव येथील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

 दरम्यान,  या तिघा संशयितांना  बार्शी न्यायालयात उभे केले असता तिघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सूरज रवींद्र वाघमारे (वय 25), मारुती गणपत वाघमारे (50) व दादाराव जानिवंत घोडके (55, सर्व रा. मालेगाव, ता. बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

बार्शी तालुक्यातील वैराग-उस्मानाबाद राज्यमार्गावरील मालेगाव हद्दीत घोडके-पाटील वस्ती परिसरात सुरुवातीस काही मोर मृत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर सलग दोन-तीन दिवस मोर मृतावस्थेत आढळत असल्याचे गावकर्‍यांना दिसून आले. हा धक्कादायक प्रकार 4 ऑगस्ट रोजी उजेडात आला होता. 

मृत मोरांचा प्रकार समोर आल्यानंतर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते यांनी याबाबत वैराग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात
 आला होता.त्यानुसार उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक  आर.एन. नागटिळक, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते, एस. डी. मगर, एस. टी. थोरात यांच्यासह वन खात्याच्या अधिकार्‍यांनी तपास करून मंगळवार, 21 रोजी दुपारी मालेगाव येथील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. दुपारी त्यांना बार्शी न्यायालयात  उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

4 ऑगस्ट रोजी मोर, लांडोर, तितर, भारतद्वाज, होला, लवच्या यांचे सडलेले अवशेष मिळून आले होते. शवविच्छेदन केल्यानंतर मृत मोरांच्या पोटातून ज्वारीसह मका आढळून आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशानेच केला असावा, असा अंदाजही व्यक्त केला होता. मालेगाव परिसरातील भौगोलिक स्थिती ही मोरांसह इतर वन्य पक्ष्यांसाठी आल्हाददायक असल्यामुळे या भागात पक्ष्यांचा जास्त वावर असायचा. अधिक तपास तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सातपुते हे करत आहेत.