होमपेज › Solapur › सोलापूर : बदलीसाठी १६० शिक्षकांची बोगसगिरी

सोलापूर : बदलीसाठी १६० शिक्षकांची बोगसगिरी

Published On: May 23 2018 12:10AM | Last Updated: May 24 2018 7:25PMसोलापूर : प्रतिनिधी

हव्या त्याठिकाणी बदली करुन घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीत चुकीची व खोटी माहिती दर्शविली असल्याच्या तक्रारींचा ओघ बुधवारीही शिक्षण विभागात येत होता. आणखी 35 तक्रारी दाखल झाल्याने आतापर्यंत 160 संघटना व व्यक्‍तींकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तक्रारींचा ओघ सुरुच असल्याने हे प्रकरण शिक्षण खात्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. सीईओ याप्रकरणी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती सादर करुन बदली करुन घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. ऑनलाईन प्रणालीने या बदल्या करण्यात आल्या होत्या. बदली झालेल्या शिक्षकांच्या नावाची यादी अजूनही प्रसिध्द करण्यात आली नाही. ही यादी प्रसिध्द झाल्यानंतर प्राप्‍त तक्रारींनुसार पडताळणी करुन विस्थापित होणार्‍या शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात येईल.

हव्या त्याठिकाणी बदली मिळविण्याच्या नादात शिक्षकच आपल्या दुसर्‍या शिक्षकबंधूचा वैरी ठरला आहे. काही शिक्षकांनी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. काहींनी पती-पत्नी एकत्रिकरणासाठी चुकीची माहिती दिली, तर काहींनी आपल्या शाळेचे अंतरच बदलून टाकले, अशा तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शिक्षकांची ही बदली प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे.

15 जूनपासून प्राथमिक शाळांना सुरुवात होत आहे. अशा परिस्थितीत 5 जूनपर्यंत बदली प्रक्रियेतील गोंधळ दूर करुन शिक्षकांना शाळा नेमून देण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे जोडली असल्याने या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे, प्रमाणपत्रानुसार तो शिक्षक खरेच अपंग आहे का याची तपासणी करणे हा मोठा आव्हानाचा विषय बनला आहे.

अपंग गुरुजींवरील कारवाई अशक्य बाब

बदलीसाठी काही शिक्षकांनी अपंग असल्याची बोगस प्रमाणपत्रे जोडली आहेत. याची तपासणी करण्यासाठी ज्या शासकीय हॉस्पिटलमधून तो दाखला मिळाला आहे त्या डॉक्टरांकडून त्याची पुन्हा पडताळणी करण्याची भूमिका शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी घेतली आहे. मात्र ही उघड बनवाबनवी असून या प्रकारामुळे समोर सदृढ शिक्षक दिसत असतानाही तो अपंगच आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई अशक्य आहे.