Mon, Mar 25, 2019 02:51
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › जिल्ह्यात यंदा उसाचे विक्रमी गाळप

जिल्ह्यात यंदा उसाचे विक्रमी गाळप

Published On: Mar 09 2018 10:36PM | Last Updated: Mar 09 2018 9:01PM सोलापूर : महेश पांढरे

सोलापूर जिल्ह्यात यंदा उसाचे विक्रमी गाळप झाले आहे. एप्रिलअखेर सोलापूर जिल्ह्यातील खासगी 19 आणि सहकारी 11 अशा 30 साखर कारखान्यांनी मिळून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 1 कोटी 51 लाख 95 हजार 925 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्या माध्यमातून आजपर्यंत 1 कोटी 59 लाख 16 हजार 670 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्हा पुणे विभागात साखर उत्पादनाबाबतीत अग्रेसर ठरला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर 11 साखर कारखाने असून त्यांनी 67 लाख 45 हजार 388 मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. खासगी तत्त्वावर जवळपास 19 साखर कारखाने आहेत. त्यांनी आजतागायत 84 लाख 50 हजार 537 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी यंदा सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात एकूण 36 साखर कारखाने असून त्यापैकी केवळ 30 साखर कारखान्यांनीच यंदा गळीत हंगाम सुरू केला होता. उर्वरित साखर कारखाने बंद होते. नोव्हेंबरमध्ये सुरु झालेल्या या गळीत हंगामाला सुुरुवातीच्या काळात ऊसदर आंदोलनामुळे गालबोट लागले होते. ऊसदराबाबत शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद पाडण्याचा प्रयत्न संघटनांनी केला होता. त्यानंतर आजतागायात गळीत हंगाम सुरळीत सुरु आहे. सर्व साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढल्याने सगळ्याच साखर कारखान्यांना मुबलक ऊस मिळाला आहे. आणखी काही दिवस गळीत हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गाळपाची आणि साखर उत्पादनाची आकडेवारी वाढण्याची शक्यता निर्माण झालली आहे.