होमपेज › Solapur › तीस दिवसांत 30 मोटारसायकल चोरीला 

तीस दिवसांत 30 मोटारसायकल चोरीला 

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:45PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे 

आधीच इंधन दरवाढीने वाहनधारकांचे कंबरडे मोडले असताना यात दुचाकी चोरांनी नागरिकांच्या नाकीनऊ आणले आहे. चालू महिन्यात महिना संपण्याअगोदच तब्बल 30 दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. थोडक्यात, दुचाकी चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

चालू महिन्यातील आकडेवारी पाहता महिन्याअखेरीअगोदरच 30 दुचाकी चोरीच्या नोंदी झाल्या आहेत. यामुळे दुचाकीधारकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  हाच आकडा कमी-अधिक होत गेला तर वर्षाला 360 दुचाकी  चोरीला जातात म्हटल्यावर दुचाकीस्वारांकरिता धक्‍काधायक बाब आहे. गुन्हे शाखेकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. काही दिवसांपूर्वी सदर बझार पोलिस ठाणे हद्दीत सात मोटारसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. असे गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गुन्हे शाखेकडून वाढ होण्याची गरज आहे    तरच दुचाकीस्वारांच्या मनात भीती निर्माण होणार आहे. सद्यपरिस्थिती पाहता दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

काही चोरटे दुचाकी चोरल्यानंतर त्याचे सुटे भाग करुन त्या सुटे भागांची विक्री करतात आणि दुचाकीचा महत्त्वाचा साठा शेजारील कर्नाटक राज्याच्या सीमेत किंवा मोठमोठ्या सार्वजनिक विहिरीत टाकून दिले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे दुचाकी चोरी उघडकीस आणण्यामध्ये अडसर ठरत आहे. चोरट्यांना दुचाकीच्या सुट्या पार्टची व्हॅल्युशन माहीत नसते. सुटे भाग करुन  मिळेल त्या किंमतीला सुटे भाग विकतात. सुटे भाग विकल्यामुळे चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध लागत नाही. गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरी टाळण्यासाठी फ्रंट व्हील लॉक लावण्यासाठी सोशल मीडियातून प्रबोधन केले जात आहे. 

नियमही माहिती असावेत 
अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय पालकांनी आपल्या पाल्याच्या हातात दुचाकी देऊ नये. दुचाकी वापरताना, चालवताना, पार्किंग करताना वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. दुचाकीची चोरी टाळण्यासाठी सतत दुचाकी लॉक करावी, फ्रंट व्हील लॉक बसवून घ्यावे, लॉक बसवण्यात आळस करु नये, लॉक असूनही आळस केला तरी चूक महागात पडू शकते. दुचाकी चोरीला गेल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याची नोंद संबंधित पोलिस ठाण्याला करणे गरजेचे आहे. कारण आपल्या दुचाकीचा गैरवापर केल्यास, कोणाला धडक देऊन त्यात मृत झाल्यास होणार्‍या क्राईमला दुचाकीस्वाराचा मालक जबाबदार असतो. त्यामुळे दुचाकी चालवणार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याअगोदर मालकांवर गुन्हा दाखल होत असतो. त्यामुळे पाल्य कितीही हट्ट करो,    त्यास दुचाकीची चावी देऊ नये. त्याच्या हातून अपघात झाला तर पाल्यास महागात पडू शकते. 

  पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे 
  शहरातील आठ पोलिस ठाणे हद्दीत फक्‍त जोडभावी पोलिस ठाणे वगळता सातही पोलिस ठाण्यांत दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पुढीलप्रमाणे कंसात दाखल गुन्हे : जेलरोड पोलिस ठाणे - 9, फौजदार चावडी - 4 ,  सदर बझार - 9, विजापूर नाका - 6, सलगर वस्ती - 1, एमआयडीसी - 1 असे एकूण 30 मोटारसायकली चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील सर्वाधिक गुन्हे जेलरोड आणि सदर बझार पोलिस ठाणे हद्दीत दाखल आहेत. कारण याच हद्दीत खासगी-शासकीय रुग्णालय, शासकीय कार्यालये, मॉल येतात.