होमपेज › Solapur › पत्रकारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार : महापौर

पत्रकारांच्या घरकुलांसाठी प्रयत्न करणार : महापौर

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:26PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 महापौर झाल्याचे श्रेय सर्व पत्रकारांना जाते, सोलापूरच्या पातळीवरच पत्रकारांच्या घरकुलांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  राजकारणात कोणताही गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न करणार आहे, घरकुल प्रश्‍नाबाबत माहिती घेऊन प्रश्‍न सोडून माझ्या करकीर्दीत घरकुल भूमी पूजन करण्याचा प्रयत्न करणार,  असे प्रतिपादन महापौर शोभा बनशेट्टी यांनी केले 
पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली.

प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रमहर्षी कै. रंगा वैद्य यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या  हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर  सोलापूरचे महापौर शोभा बनशेट्टी,  अप्पर जिल्हाधिकारी  रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पत्रकार राजा माने,  राकेश टोळे, दै. ‘पुढारी’चे  श्रीकांत साबळे, जिल्हा माहिती  अधिकारी  रविंद्र राऊत, रघुवीर मदन, ज्येष्ठ पत्रकार जे.टी. कुलकर्णी, मनोज व्होटकर, सुनील शिनखेडे  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार पांडुरंग काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले की, लोकशाही ही चार स्तंभावर आहे. सकारात्मक लिखाणामुळे लोकशाही प्रबळ झाली आहे. नागरिकांचे प्रश्‍न बातमीमुळे सुटतात. बातम्यांमुळे शासन-प्रशासनाला दिशा मिळते. भीमा - कोरेगाव प्रकरणात पत्रकारांनी सोलापुरातील वातावरण शांत ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. आपण सकारात्मक भूमिका मांडली, असे  पोलिस आयुक्त तांबडे म्हणाले. यावेळी पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू म्हणाले की, भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्रत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना सोलापुरात पत्रकारांनी संयमाने वार्तांकन केले. याबद्दल पत्रकारांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कदम यांनी, तर सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले.